नागपूर : महाराष्ट्र दिनी नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. यात काही आंदोलक जखमीही झाले आहेत.


विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्त्यांनी आज नागपुरातल्या विधानभवनावर मोर्चा काढला. मात्र विधानभवनावर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना अडवलं आणि आक्रमक कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.

नागपूरात आज महाराष्ट्र दिनीच विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावला. विष्णूजी की रसोईच्या प्रांगणात हा झेंडा फडकावण्यात आला. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रपुरातल्या विदर्भवाद्यांनीही वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावून आंदोलन केलं. वेगळ्या विदर्भाचे समर्थक गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र दिवस हा अन्यायाचा दिवस म्हणून पाळतात. चंद्रपूरच्या जनता महाविद्यालय परिसरात विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावून वेगळ्या विदर्भ राज्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित लोकांनी यावेळी वेगळ्या विदर्भाची शपथ घेतली. विदर्भाचा अनुशेष फक्त स्वतंत्र विदर्भ राज्य दूर करु शकतो, असा दाव यावेळी करण्यात आला.