लातूर : शेतकऱ्यांचा माल थेट खरेदीदाराने खरेदी करावा यासाठी सरकारने अडत्यांची मध्यस्थी संपविण्यासाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय आणला आहे. त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण आणले आहे. मात्र या व्यवहारात काही अनियमितता आल्यास फटका मात्र अडत्यांना बसत आहे. त्यांचे पैसे यामुळे अडकून पडत आहेत. या ऑनलाईन खरेदीच्या विरोधात लातूरमध्ये अडते आक्रमक झाले असून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कुठलाही सौदा निघाला नाही.
काही महिन्यांपूर्वी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने ऑनलाईन खरेदी व्यवहार करणे अनिवार्य केले होते. यात फक्त सोयाबीनचा समावेश करण्यात आला होता. हा नियम करताच अडत्यांनी त्यास विरोध केला होता. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सर्व जबाबदारी घेत ऑनलाईन खरेदी प्रक्रिया सक्तीची केली होती.
सुरुवातीपासूनच या प्रक्रियेत पेमेंट उशिरा येणे, चढा भाव अशा अनेक समस्यांनी अडते जेरीला आले होते. त्यातच तीन खरेदीदारांनी 125 पेक्षा जास्त अडत्याचे 13 कोटींपेक्षा जास्त रक्कम अडवून ठेवल्याने अडते आज आक्रमक झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने आता मध्यस्थी करावी, आमचे पैसे अडकले आहेत, ते द्यावेत अशी भूमिका घेत आज बाजार बंद ठेवला.
बराच वेळ हे सर्व अडते कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वार जवळ ठिय्या मांडून बसले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि अडते यांच्यात बोलणी झाल्यावर हा तिढा तात्पुरता मिटला असून उद्यापासून बाजार सुरू होणार आहे.
अडत्यांचे ऑनलाईन खरेदीच्या प्रकारामुळे हातातील व्यवहार जात आहे. खरेदीदाराकडून थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जात आहे. यामुळे वर्षानुवर्षांचा त्यांच्या व्यवहारावरच गदा येत आहे. शेतकऱ्यांना अडते काही प्रमाणात उचल देत असतात. ऑनलाईन खरेदीत ही उचल काटता येत नाही. खरेदीदाराने पैसे उशिरा जमा केले तर पैसे अडकून पडतात. नियमाने 24 तासात पैसे देणे बंधनकारक असताना पैसे महिना-महिना अडकून पडले आहेत. याचा शेतकऱ्यांपेक्षा अडत्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
ऑनलाईन खरेदीच्या विरोधात अडते आक्रमक, लातुरात गोंधळ
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
16 Jan 2019 10:46 PM (IST)
बराच वेळ हे सर्व अडते कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वार जवळ ठिय्या मांडून बसले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि अडते यांच्यात बोलणी झाल्यावर हा तिढा तात्पुरता मिटला. उद्यापासून बाजार सुरू होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -