अकोला: येत्या 3 फेब्रुवारीला अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. मात्र त्याआधी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि उमेदवार डॉ.रणजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप होता आहेत.
निवडणूक शपथपत्रात संपत्ती दडविल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रशांत काटे यांनी केला आहे. याआधीही 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत रणजित पाटील यांनी संपत्तीच्या विवरण प्रतिज्ञापत्रात स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या नावानं असलेल्या संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी केला होता. त्यावेळी चौकशीत त्यांना क्लीनचिट मिळाली होती.


विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत जी संपत्ती लपविल्याचा आरोप रणजीत पाटलांवर झाला होता. त्या संपत्तीचा सध्याच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. मात्र इतर संपत्ती लपवल्याचा आरोप पुन्हा रणजीत पाटलांवर झाला आहे.

डॉ. रणजीत पाटील यांनी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवितांना दडविलेली माहिती यावेळी दाखविल्याचे पुरावे प्रशांत काटे यांनी सादर केले आहेत. पत्नी आणि मुलीच्या नावाने औद्योगिक वसाहतीतील दोन भूखंडही पाटील यांनी दाखविले नसल्याचं काटे म्हणाले आहेत.

रणजीत पाटलांवर आरोप करणारे अपक्ष उमेदवार प्रकाश काटे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रांत काटे हे सख्खे भाऊ आहेत. ऐन निवडणूकीच्या तोंडावर रणजीत पाटलांवर आरोप होत असल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासंदर्भात रणजीत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अमरावती येथे आपल्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने संपर्क होवू शकला नाही.