सांगलीतील विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात प्राध्यापकाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 10 Dec 2018 09:18 PM (IST)
सांगलीतील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात शिकणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात सांगली पोलिसांनी एका प्राध्यापकाला अटक केली आहे.
सांगली : सांगलीतील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात शिकणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात सांगली पोलिसांनी एका प्राध्यापकाला अटक केली आहे. ऋषिकेश कुडाळकर असे या संशयित प्राध्यापकाचे नाव असून खुनाच्या घटनेनंतर तो फरार झाला होता. सांगलीच्या शांतिनिकेतन येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधील विद्यार्थिनी वैशाली नलवडे - मुळीक हिची रविवारी निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. विद्यापीठाच्या इमारतीमधील एका वर्गात वैशालीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यामुळे शांतिनिकेतन परिसरात खळबळ उडाली होती. शवविच्छेदनामुळे समजले खून की आत्महत्या? या प्रकरणी काल संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला आत्महत्या की घातपात याबाबत पोलिसांच्या समोर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शवविच्छेदन केल्यानंतर वैद्यकीय अहवालामध्ये वैशालीचा गळा दाबून तसेच भिंतीवर डोके आपटल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वैशाली एका तरुणासोबत त्या अभ्यास केंद्राच्या इमारतीमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटजेमधून समोर आले. त्यावरून त्या तरुणाने खून केल्याचा संशय निर्माण झाला होता. घटनेनंतर तो तरुण फरार होता. याबाबत तपास करुण ओळख पटवली असता, तो तरुण प्राध्यापक ऋषिकेश कुडाळकर असल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तसेच इतर तपास केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून प्राध्यापक ऋषिकेश कुडाळकर याला अटक केली. परंतु या खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्यामुळे पोलीस सध्या कुडाळकरकडे चौकशी करत आहेत. व्हिडीओ पाहा : शांतिनिकेतन मुक्त विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ | सांगली | एबीपी माझा