Maharashtra News: एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला की, त्याला शिक्षा दिली जाते. न्यायालयानं शिक्षा दिल्यानंतर त्या व्यक्तिला कारागृहात राहून शिक्षा भोगावी लागते. अनेकदा कारागृहात असताना कैदी काय करतात? त्यांचं आयुष्य त्या चार-भिंतींमध्ये कसं असतं? यांसारखे अनेक प्रश्न पडतात. अशातच बॉलिवूडपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या दृष्यांवरुन अनेकजण कैद्यांच्या दिनक्रमाबाबत तर्कवितर्क लावतात. कैदी हा तुरुंगात अधिकतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंततो आणि स्वत:चीच टोळी तयार करतो, असा समाजाचा समज आहे. मात्र प्रत्यक्षात मात्र चित्र फार वेगळं असतं. कैद्यांचा कारागृहातील दिनक्रम ठरलेला असतो. त्यानुसार त्यांना कामं करावी लागतात. कारागृहातील वर्कशॉपमध्ये आपल्या हातात असलेली कला जपण्यात कैदी व्यस्त असतात. या कैद्यांना महाराष्ट्र कारागृह अधिकारी काम देत असून वेगवेगळी उत्पादनं त्यांच्याकडून बनवून घेतली जातात. त्यांचं पुनर्वसन केलं जातं.
आता याच उपक्रमात आणखी एक पाऊस पुढे टाकत नवा उपक्रम राबवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या कारागृहातील कैद्यांनी बनवलेली विविध उत्पादनं ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. तुरुंग अधिकारी उत्पादनं लाँच करण्यासाठी सज्ज आहेत आणि त्याचं दरपत्रकही तयार करण्यात आलं आहे. उत्पादनामध्ये लाकडी उत्पादनं, सँडल, शर्ट, टॉवेल, नऊवारी साड्या यांचा समावेश आहे. अशी 400 हून अधिक उत्पादनं कैद्यांनी बनवली आहेत.
कैद्यांनी बनवलेल्या उत्पादनांमध्ये गणेश मूर्ती, विविध प्रकारची सागवानी लाकडी टेबल, खुर्च्या, कपाट, बेंच, शर्ट, ट्रॅक पेंट, टॉवेल, रुमाल, बेडशीट, लेदर बॅग, सँडल, मास्क, लाकडी शोपीस, इको फ्रेंडली कॅरी बॅग, हाफ जॅकेट, कुर्ता, लेदर बेल्ट, नऊवारी साडी, बेकरी उत्पादनं आणि इतर काही उत्पादनांचा समावेश आहे.
महाराष्ट्र कारागृह प्रशासनानं जाहीर केलेल्या उत्पादनांच्या ताज्या यादीमध्ये जवळपास 437 प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. 5 रुपयांपासून सुरू होणाऱ्या उत्पादनाची श्रेणी नागरिकांच्या आवडीनुसार, 65,000 रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्र तुरुंग विभागाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता, इतर तुरुंग कर्मचाऱ्यांसह उत्पादने ऑनलाइन पोर्टल तयार करण्याची आणि विक्रीनंतर चांगला परतावा मिळणाऱ्या कैद्यांचे कार्य प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.
कारागृह विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंची दरवर्षी दिवाळीच्या मेळाव्यात 10 दिवस विक्री होत असते. नंतर तुरुंगाबाहेरील दुकानात उत्पादनं विकली गेली. परंतु आता बदलत्या ट्रेंडमुळे आम्ही नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आजकाल लोक ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास ठेवत असल्यानं आम्ही ऑनलाइन मार्केट पकडण्याचा विचार करत आहोत. जेणेकरून कैद्यांनी बनवलेल्या उत्पादनांना सर्वोत्तम दर मिळतील.", असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
केवळ ऑनलाईन खरेदीच नाही तर कैद्यांनी बनवलेल्या 'इनमेट' या ब्रँड नावाच्या लेदर फूटवेअर सँडलच्या जोड्या यापूर्वीच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि अनेक युरोपीय देशांमध्ये निर्यात केल्या गेल्या आहेत. सन 2021-22 मध्ये कारागृहातील कारखाना उद्योगाचे ₹ 11.10 कोटी आणि शेतीचे 2.36 कोटी रुपयांचं उत्पादन झालं आहे. कारागृह उद्योगांतर्गत सुतारकाम, शिवणकाम, लोहारकाम, यंत्रमाग, हातमाग, बेकरी, चर्मकला, धोबीकाम, कागद कारखाना, रंगकाम, रसायन उद्योग, मोटार सर्व्हिसिंग, मूर्ती काम इत्यादी उद्योग चालवले जातात.