सातारा : काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले असून शिवसेनेला मुंबईत पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट कलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी युतीसंबंधीच्या सर्व शक्यतांना उत्तर दिलं. तसंच युतीसंदर्भातीत सर्व प्रस्तावांवर विचार केला जाईल असंही सांगितलं.
राज्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आघाडीसाठी राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जय-पराजय हा कधी वैयक्तिक नसतो, तो सामुदायिक असतो, त्यामुळे संजय निरुपमांचा राजीनामा ही त्यांची वैयक्तीक बाब असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. राजीनामा देण्यापेक्षा अंतर्मुख होऊन विश्लेषण करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
"नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमच्या चुका झाल्या आहेत, त्यामुळे झालेल्या चुका सुधाराव्या लागतील, आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यास कुठेतरी कमी पडलो, नोटाबंदीचा निर्णय पोहोचवण्यात कमी पडलो. मोदी जास्त पोहोचले, त्यामुळे भाजप राज्यभरात आघाडीवर आहे," असंही त्यांनी मान्य केलं. तसंच सेना-भाजप युती झाल्यास दोघांच्याही विश्वासार्हतेचा कस लागेल असंही त्यांनी युतीच्या मुद्द्यावर बोलताना स्पष्ट केलं.