Majha Maharashtra Majha Vision : कोरोनाकाळात आम्ही जीवरक्षणाला सर्वोच्च महत्व दिले. मात्र, या काळात अर्थचक्र थांबू नये यासाठीही प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय टाळेबंदीनंतरही एप्रिलमध्ये महाराष्ट्राने उद्योगधंद्याना परवानगी देऊन रोजगार जावू दिले नाही. रोजगारांना प्राधान्य हेच आपले उद्योग धोरण आहे. फक्त महसूल मिळावा यासाठी उद्योगधंदे निर्माण करायचे नसून नवीन रोजगार निर्मिती करण्यावर आपला भर आहे, अशी भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात मांडली.



महामारी काळातही महाराष्ट्र थांबला नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षात 60 कंपन्यांसोबत राज्य सरकारने करार केले आहेत. यातील अनेक कंपन्यांनी आता आपले उद्योग उभारायला सुरुवात देखील केली आहे. यात नवनवीन उद्योगांचा समावेश आहे. यातीलच एक डेटा सेंटर आपल्याकडे उभं राहत आहे. किनारपट्टी भागात आपल्याकडे डेटा सेंटर विकसित होत आहे. यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. या विभागातून सर्वाधिक रोजगार निर्मित होत आहे. शिवाय आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान शाखेत असंख्या विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यामुळे अशा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कुशल कामगारही मिळणार आहे.


वैद्यकीय साहित्य कंपन्या उभ्या राहणार
जगभरात सध्या महामारी सुरु असून भविष्यातही अशा गोष्टी होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय साहित्य आणि औषधांची गरज लागणार आहे. या दृष्टीकोनातून आम्ही औषध आणि वैद्यकीय साहित्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या राज्यात आणत आहोत. या कंपन्यांमुळे इथल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.


पर्यावरपूरक उद्योग हेच आपलं धोरण : देसाई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच व्हिजन हे पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी करणारा कोणताही उद्योग राज्यात आणू नका, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. पर्यावरणपूरक भूमिका घेऊनच उद्योग आणायचं आमचं धोरण आहे. पर्यावरणाचा बळी देऊन आम्ही उद्योगधंदे आणणार नाही.


भांडवलासाठी नवीन मार्ग निवडावे : देसाई
कोणत्याही उद्योगाला भांडवल लागतेच. मात्र, आता भांडवलासाठी पारंपरिक पर्यायावर अवलंबून राहू नका, असे आवाहन सुभाष देसाई यांनी उद्योजकांना केले. आम्ही शेअर मार्केटचा वापर उद्योगधंद्यात भांवडल निर्मिती करण्यासाठी करत आहोत. सध्या राज्यात जवळपास 400 हून अधिक लघूउद्योग हे शेअर बाजारातील भांडवलावर उभे आहेत. शेअर बाजाराला महिन्याला हप्ते वैगेर नसतात. बँकांतून भांडवल मिळवण्यास अनेक अडचणी येतात. मात्र, शेअर मार्केटमधून भांडवल उभे राहणे सोप्प आहे. त्यामुळेच उद्योजकांनी भांडवल उभे करण्यासाठी चाकोरीबद्ध निर्णय घेऊ नका, असे मत उद्योगमंत्री सुभाई देसाई यांनी माझा व्हिजन माझा महाराष्ट्र कार्यक्रमात मांडले.