सोलापूर : इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या पंढरपूर शहरातील एका मुलावर खोडकरपणा, मुलींची छेडछाड, शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवत थेट हातात दाखला देण्याचा प्रताप शाळेने केला आहे. हा मुलगा एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. या घटनेनंतर या चिमुरड्या मुलाला आमि त्याच्या पालकांना मोठा मानसिक धक्का बसला होता.
आपल्याला शाळेतून का काढले? आता आपण कधीच शाळेत जाणार नाही का? असे निरागस प्रश्न विचारून तो सध्या घरच्यांना भांडावून सोडत आहे. महाराष्ट्रात धडधडीतपणे कायदा धाब्यावर बसवून संतापजनक मनमानी कारभार करणाऱ्या शाळेला शिक्षणमंत्री कायद्याचा बडगा दाखवणार का? असे सवाल आता नागरिक विचारत आहेत.
पहिलीतील विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीचा विचार न करता असे मूर्खपणाचे आरोप ठेवल्याने हे कुटुंब खचून गेले होते. शाळेच्या मूर्खपणाचा हा प्रताप एबीपी माझाने समोर आणल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग आली आहे. माझाच्या बातमीनंतर शिक्षण विभागाचे एक पथक या शाळेत चौकशीसाठी गेले आहे. या सर्व प्रकाराचा अहवाल शाळेकडून मागविण्यात आला असून शिक्षणाच्या कायद्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येत नसताना या मुलाचे नाव कसे कमी केले? असा सवाल शिक्षण विभागाने शाळा प्रशासनाला केला आहे. याशिवाय पहिलीचा विद्यार्थी शिक्षिकेशी कसे लाजिरवाणे व अश्लील कृत्य करू शकतो? याचाही खुलासा मागवण्यात आला आहे.
घाणेरडे आरोप ठेवून विद्यार्थ्याला शाळेतून काढणे पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याला तातडीने शाळेत घेण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून दिले जाणार असल्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले. शाळेकडून खुलासा मागविण्यात आला असून या खुलाशानंतर शाळेवर कायद्यानुसार काय कारवाई करायची? याचा निर्णय घेतला जाईल, असे राठोड यांनी सांगितले.
दरम्यान, पहिलीच्या मुलावर ठेवलेल्या या घाणेरड्या आरोपानंतर शहरात याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वयात असणाऱ्या मुलांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर एवढी वाढच झालेली नसते. असे काही कृत्य जरी घडले असले तरी ते त्यांच्या निरागस भावनेतून घडलेले असते असे प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर विनायक राऊत यांनी माझाशी बोलताना सांगितले.
आपल्या निरागस मुलावरील अन्याय दूर होऊन त्याला पुन्हा सन्मानाने शाळेत घेतले जाणार नाही तोवर आपण शाळेविरोधात लढा सुरु ठेवणार असल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले. आता स्रर्वच पातळीवरून शाळा व्यवस्थापनाविरोधात संताप बाहेर पडू लागल्यानंतर शाळा प्रशासन आपली भूमिका बदलणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असून आता शिक्षण खाते या शाळेवर काय कारवाई करणार? मुलाला काय न्याय देणार? याचे उत्तर येत्या दोन दिवसात मिळणार आहे .
शिक्षिकेशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप, पहिलीतल्या मुलाला शाळेतून काढले, शिक्षण विभागाने अहवाल मागवला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2019 07:07 PM (IST)
इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या पंढरपूर शहरातील एका मुलावर खोडकरपणा, मुलींची छेडछाड, शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवत थेट हातात दाखला देण्याचा प्रताप शाळेने केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -