मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्याची जाबाबदारी शरद पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आजपासून पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज सोलापुरात बोलताना पवारांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. त्यांनी आता आपण घरी जाणार नसल्याचं सांगितलं आहे. आता जिंकेपर्यंत थांबायचं नाही, अशी शपथ सगळ्यांनी घ्या, असं म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांना नवी उर्जा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या शरद पवारांनी काय केलं? या वक्तव्याचा समाचार देखील घेतला. ते म्हणाले की, शरद पवारांनी बरं वाईट केलं असेल. पण कधी तुरुंगात गेलो नाही, असं म्हणत पवारांनी अमित शाह यांना प्रत्युत्तरही दिलं.

यावेळी पवार म्हणाले की,  माझ्या राजकारणाची सुरुवात ही सोलापुरातून झाली. 1965 साली तरुणांचं नेतृत्व मी केलं, सोलापूरची जबाबदारी माझ्यावर होती.  स्वातंत्र्य इतिहासात सुवर्ण इतिहासात नाव लिहावा असा सोलापूर जिल्हा आहे. स्वाभिमानाचा पुरस्कार करणाऱ्या जिल्ह्यात काहींनी लाचारी पत्करली असून त्यांना जागा दाखवा, असे पवार म्हणाले. काही लोकांना आजच्या परिस्थितीत इथे राहणे अवघड झालं होतं, त्यांना जागा दाखवा, असे पवार म्हणाले. मावळणाऱ्यांची चिंता करू नका, उजडणाऱ्यांची काळजी घेऊ, असे ते म्हणाले.

हे ही वाचा -अन्यायाची समज यायला उदयनराजेंना 15 वर्षे लागली : शरद पवार

पवार म्हणाले की, सोलापूर हा दुष्काळी जिल्हा आहे. इथला माणूस गरीब आहे, मात्र लाचार नाही, असे ते म्हणाले.  1957 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काँग्रेसचा पराभव झाला, मात्र सोलापुरात काँग्रेस जिंकली.  त्याच पद्धतीने इतर ठिकाणी काय झालं याची काळजी न करता, इथे इतिहास घडवू, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की,  सोलापूर कामगारांची नगरी आहे. हा जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. महाराष्ट्रमध्ये 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जामुळे 16 हजार कुटुंबाच्या कर्त्यांनी आत्महत्या केल्या. आजचे राज्यकर्ते यासाठी काय करतायत? असा सवाल त्यांनी केला. संकटग्रस्तांच्या मागे उभं राहण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. मात्र हेलिकॉप्टरने राज्यकर्ते फिरतात, 30 मिनिटानंतर राज्यकर्ते दिसत नाहीत, असेही ते म्हणाले.  महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. पवार म्हणाले की, राजन पाटील म्हणाले मी 80 वर्षाचा झालो, मी काय म्हातारा झालो का? असे म्हणत अजून बऱ्याच लोकांना घरी पाठवायचं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवार म्हणाले की, काळजी करू नका, हा माझा पहिला टप्पा आहे, माझा प्रवास सुरु राहील. यापुढे साताऱ्यातही जाईन, घरी येणार नाही मी सांगितलं आहे. जिंकेपर्यंत आता थांबायचं नाही, ही शपथ आता सर्वांनी घ्या. जाणाऱ्यांची चिंता करू नका, त्यांचे नाव काढू नका. महिन्याभरात निवडणुका होतील जाणाऱ्यांचे नाव इतिहास जमा होतील, असेही पवार म्हणाले.


राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबन शिंदे कार्यक्रमाला अनुपस्थित  
शरद पवार यांच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला आज पासून सुरुवात झाली. पक्षाला लागलेल्या गळतीमुळे बालेकिल्याला धक्का लागलाय तर आज पुन्हा विद्यमान आमदाराने कार्यक्रमाला दांडी मारली. माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.  गेल्या अनेक दिवसापासून  आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादीला रामराम करून भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. आमदार बबन शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखतीला सुद्धा दांडी मारली होती. आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या बैठकीला अनुपस्थित राहून राष्ट्रवादीला रामराम करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शरद पवार यांनी देखील बबन शिंदे यांची भेट नाकारल्याची माहिती आहे. त्यामुळे रश्मी बागल, दिलीप सोपल यांच्यानंतर बबन शिंदे देखील भाजपात जाणार का हे पाहावं लागणार आहे.