मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची माहिती देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा उद्या (18 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र उद्या निवडणूक जाहीर होणार नाही. राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पथक राज्यातील निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आज (17 सप्टेंबर) राज्यात आलं आहे. निवडणुका जाहीर करण्यापूर्वी हे पथक दोन दिवस (आज आणि उद्या) राज्य सरकार, महाराष्ट्र पोलिस, रेल्वे, आयकर विभाग, उत्पादन शुल्क आणि इतर विभागांमधील अधिकाऱ्यांची भेट घेईल. तसंच हे त्रिसदस्यीय पथक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते यांच्यासोबतही बैठक घेणार आहेत.

"तीन सदस्यीय पथक दोन दिवस पाहणी करुन बैठक घेईल. त्यानंतर गुरुवारी (19 सप्टेंबर) निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. महाराष्ट्रातील निवडणूक दोन टप्प्यात पार पडू शकते तर यंदा झारखंडमध्ये वेगळा पॅटर्न पाहायला मिळू शकतो. 2014 मध्ये इथे पाच टप्प्यात मतदार झालं होतं," असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. यंदा महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "तारखा जाहीर झाल्यानंतर आम्हाला निवडणुकीच्या तयारीसाठी 35 दिवसांचा अवधी हवा असतो, असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं. दिवाळीच्या सूट्टीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी आणि यंदा दिवाळी 27 ऑक्टोबर रोजी आहे."

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडे अतिरिक्त पोलिस सुरक्षेची मागणी केली आहे.