मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कायद्य़ाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी पत्रकारांच्या सुरक्षेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

गेल्‍या सहा वर्षात  17 हजार 682  अधिकाऱ्यांवर हल्‍ले झाले म्‍हणून जनतेच्‍या अधिकारांवर गदा आणत सरकारी अधिकाऱ्यांनी स्‍वसंरक्षार्थ आयपीसीच्‍या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक तात्‍काळ मांडले. तेच अधिकारी तीच तत्‍परता चार वर्षात 337 पत्रकार आणि 52 मिडिया हाऊसवर हल्‍ले झाले म्‍हणून पत्रकार संरक्षण कायदा करण्‍याबाबत का दाखवत नाही, असा सवाल आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

भारतीय दंड संहिता 1860 च्‍या कलम 332, 333 आणि 353 मध्‍ये सुधारणा सुचविणारे विधेयक आज विधानसभेत मांडण्‍यात आले होते. या विधेयकावर बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी हे विधेयक जनतेच्‍या घटनादत्‍त अधिकारावर गदा आणणारे तर नाही ना? असे सांगतच पत्रकारांवरील हल्‍याचा विषयही त्‍यांनी मांडला. गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा करा, अशी मागणी विविध पत्रकार संघटना करत आहेत. असे सांगत पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ आणावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.