मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. आदिवासी समाजातील शिवसैनिकांनी विनंती केल्यानंतर आपण एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना आपण पाठिंबा जाहीर करत असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काल झालेल्या खासदारांच्या बैठकीत माझ्यावर कोणीही दबाव आणलेला नाही, कुणाला पाठिंबा द्यायचा हा माझ्यावर निर्णय सोपवला होता असंही ते म्हणाले. 


सोमवारी शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक घेतली होती. त्यामध्ये खासदारांनी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावी अशी विनंती केली होती. पण अखेरचा निर्णय हा आपल्यावरच सोपावला होता असं उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. त्यानंतर आता आदिवासी समाजातील शिवसैनिक आणि नेत्यांनी आपल्याला द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा अशी विनंती केल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. 


उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर आपली भूमिका स्पष्ट केली. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होत असेल तर आपल्याला आनंद आहे असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, "या आधी प्रतिभा पाटील यांना आणि त्यानंतर प्रणब मुखर्जी या यूपीएच्या उमेदवारांना शिवसेनेने एनडीएपेक्षा वेगळा निर्णय घेतला होता. आताही शिवसेना तशीच वेगळी भूमिका घेत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करत आहे."


पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या माजी आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्येत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.


राजकारणापलिकडे जाऊन याआधीही निर्णय: संजय राऊत
काल मातोश्री बंगल्यावर शिवसेना खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कोणाला आपलं समर्थन देणार यावर चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''कालच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ही चर्चा दोन्ही बाजूंनी झाली. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेनं यापूर्वीही अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना आपलं पाठबळ दिलं आहे''.