मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदाराचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप प्रणित राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव वाढत असल्याचं चित्र आहे. यात पहिलं पाऊल टाकलंय  ते खासदार राहुल शेवाळे यांनी. आदिवासी महिलेच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना पक्षाने पाठिंबा द्यावा अशी मागणी राहुल शेवाळे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल शेवाळे यांच्या विचाराचे 11 खासदार असल्याची माहिती आहे. 


खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात शिवसेनेच्या या आधीच्या भूमिकेची आठवण करुन दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी याधी पक्षभेद न पाळता राज्याची कर्तृत्ववान महिला असलेल्या प्रतिभा पाटील यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावं यासाठी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा आदर करत त्यांनाही पाठिंबा दिला होता. आता हीच परंपरा कायम ठेवावी आणि आदिवासी समाजातील एका महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेनेने द्रौपी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 


राहुल शेवाळेंच्या या पत्रानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरुन शिवसेना खासदारांचा असंतोष समोर येईल का, आमदारांपाठोपाठ शिवसेना खासदारही वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या शिवसेनेचे महाराष्ट्रातून 18 आणि दादरा नगर हवेलीच्या एक असे 19 खासदार लोकसभेत आहेत. त्यातील काहींनी मविआमधील काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 


आमदारांच्या बंडामुळे पक्षाला पडलेलं मोठं खिंडार भरुन येण्याआधीच खासदारांची नाराजी दूर करण्याचं आव्हान आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात, खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्राला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातले विकृत हासू आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांच्या डोळ्यातले अश्रू यातून मला मार्ग काढायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकांच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत मोजावी लागणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी दिला आहे. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच बंडखोरांचा उल्लेख गद्दार असा केला आहे.