मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काल एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू प्रचंड बहुमतानं विजयी झाल्या. त्यांच्या विजयानंतर आता चर्चा सुरु आहे ती मतदानातल्या आकडेवारीची. या निवडणुकीत अनेक राज्यांत क्रॉस व्होटिंगचे प्रकार पाहायला मिळाले. शिवाय महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी केलेले दावे किती प्रभावी ठरले त्यावर एक नजर टाकुयात. 


देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून गुरवारी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. निवडणुकीत 6 लाख 76 हजार 803 मतं मिळवून त्यांनी बाजी मारली. या निवडणुकीत देशभरात जवळपास 124 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. पण अर्थात सगळ्यांचं लक्ष होतं महाराष्ट्रात. कारण इथे नुकतंच सत्तांतर झालं होतं आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनीही 200 च्या पेक्षा जास्त मिळवून देऊ असा दावा केला होता. 


राष्ट्रपती निवडणुकीत खरंतर कुठल्याही पक्षाला व्हिप काढता येत नाही. आमदार, खासदारांना स्वत:च्या विवेकबुद्धीचा वापर करुन मतदान करायचं असतं. एक आदिवासी महिला राष्ट्रपती भवनात पोहचली याबद्दल देशात सर्वांनाच आनंद आहे. पण स्वत: मुख्यमंत्र्यांनीच याबाबत काही मतं फोडण्याचे दावे केल्यानं त्याचं नंतर काय झालं याचं विश्लेषण करण्याची वेळ आली आहे. 


राष्ट्रपती निवडणुकीत मिशन 200 फेल झालं?



  • महाराष्ट्रात भाजपची आणि मित्रपक्षांची संख्या- 113 

  • त्यापैकी मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांनी मतदान केलं नाही- 111

  • शिंदे गटाचे आमदार आहेत- 52

  • शिवसेनेच्या मातोश्री गटाचे आमदार- 15

  • ही संख्या होते- 178

  • द्रौपदी मुर्मू यांना मतं मिळाली- 181 


म्हणजे ठरलेल्या मतांपेक्षा अधिकची मतं मिळाली ती तीन, पण 200 पर्यंत काही आकडा पोहचू शकला नाही


राष्ट्रपती निवडणुकीवरुन शिवसेनेच्या खासदारांचीही नाराजी समोर आली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी उघडपणे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यानंतर दबावापोटी शिवसेनेला हा निर्णय जाहीर करावा लागला होता. पण तेव्हा हा पाठिंबा एनडीएला नसून एका आदिवासी महिलेला आहे ही भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. पण त्यानंतरही खासदारांचं बंड काही शमलं नाही. 12 खासदारांनी शिंदे गटाची सोबत करायचं ठरवलं. 


द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाची वैशिष्ट्ये-



  • द्रौपदी मुर्मू यांना देशातल्या सर्व राज्यांमधून मतं मिळाली.

  • केरळमध्ये एनडीएचा एकही आमदार नाही, पण तिथेही एक मत मुर्मूंना मिळालं

  • याउलट विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आंध्र प्रदेश, सिक्कीम, नागालँड या तीन राज्यांमध्ये एकही मत मिळालं नाही.

  • यशवंत सिन्हा मूळचे झारखंडचे, तिथं त्यांना 81 पैकी 9 आमदारांनी मत दिलं

  • मुर्मू या मूळच्या ओडिशाच्या, तिथं 147 पैकी 137 आमदारांनी त्यांना मत दिलं


राष्ट्रपती निवडणुकीनंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय होतं याचीही उत्सुकता असेल. कालच ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, ज्यांच्याशी इतके दिवस त्यांचं विळ्याभोपळ्याचं नातं होतं, तेच आता उपराष्ट्रपती म्हणून दिल्लीला चाललेत. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी, जगदीप धनखड, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा यांची एक मुलाखतही झाली होती. त्यानंतरच धनखड यांची उमेदवारी जाहीर झाली होती. 


राज्यसभा, विधानपरिषद आणि त्यानंतर सत्तांतर अशी मतफुटीची तिहेरी मालिका महाराष्ट्रात भाजपनं जून महिन्यात घडवून आणली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणूक होत होती. 200 पेक्षा अधिक मतं मिळवून देऊ हा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. तो यशस्वी झाला नसला तरी भविष्याच्या राजकारणात सरकारच्या मदतीला येणारे अदृश्य हात उघड होणार का हे पाहावं लागेल.