नागपूर : विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडियांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बनवण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण नाही केलं, असा आरोप तोगडियांनी केला आहे.


"आम्ही आरएसएसमध्ये सामिल झालो, कारण आम्हाला वाटत होतं की ही एक हिंदू संघटना आहे. मात्र आता आम्हाला जाणवू लागलं आहे, आरएसएस मुस्लीम समाजासाठी काम करणारी संघटना आहे. केवळ मुस्लीम समाजाच्या हिताचा विचार ही संघटना करते." तसेच आरएसएसला राम मंदिर बनवण्यात काहीही रस नसल्याचा आरोपही तोगडियांनी केला.


"एससी, एसटी यांच्या प्रश्नांबाबतचे निर्णय न्यायालयांऐवजी संसद घेईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र राम मंदिराचा मुद्दा येतो त्यावेळी हा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे, याचा निर्णय संसदेत नाही घेता येणार, असं मोदी म्हणतात. अशारितीने राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदी काढत पाय घेत आहेत" असा आरोप तोगडियांनी केला.


"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी राम मंदिर बनवण्याचं आश्वासन दिलं, मात्र आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. मोदी आता मुस्लीम महिलांचे वकील बनले आहे", असा आरोप तोगडियांनी केला. तसेच आगामी निवडणुकीत 'अब की बार हिंदुओ की सरकार' अशी आमची घोषणा असल्याचंही तोगडियांनी सांगितलं.


"सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बनवण्याची मागणी करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदेश द्यायला हवे. सरकारने संसदेत कायदा करून राम मंदिराचा रस्ता मोकळा करायल हवा", अशी मागणी तोगडियांनी केली.


"राम मंदिर बनवण्यात भाजप नाही तर मोदी सर्वात मोठी अडचण आहेत. त्यामुळे येत्या 20 ऑक्टोबरपासून राम मंदिराच्या मागणीसाठी लखनौ ते आयोध्या यात्रा काढली जाणार असून त्यानंतर आंदोलन केलं जाणार आहे", अशी माहिती तोगडियांनी दिली.