नागपूर : लक्षात ठेवा मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात... जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केलं नाही ना, तर मुंबई ठप्प होईल... मुंबईकरांना जेवायला ( रोटी सब्जी ) मिळणार नाही... आम्हाला असं करायचं नाही... मात्र, तसं करण्यासाठी आम्हाला मजबूर करू नका, अशा शब्दात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईकरांना थेट धमकीच दिली आहे.

नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरूपम यांनी ही आगपाखड केली. निरुपम एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही इशारा दिला. उद्योगपती विजय मल्ल्याला पळवण्यामागे 95 कोटींची डील झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

गुजरातमध्ये लहान मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत. बलात्काराच्या आरोपात अटक केलेली व्यक्ती उत्तर भारतीय आहे. त्यामुळे सर्व उत्तर भारतीयांना दोषी मानणं चूक आहे. आज जर पंतप्रधानांच्या गृह राज्यात उत्तर भारतीयांवर हल्ले होणार असेल तर याद राखा एके दिवशी पंतप्रधानांनाही बनारसमध्ये जायचं आहे, अशी धमकी निरुपमांनी दिली.

मुंबईकरांबद्दल काय म्हणाले निरुपम?

“लक्षात ठेवा उत्तर भारतीय वर्ग महाराष्ट्र चालवतो... मुंबईला चालवतो... दूध, भाजी, वर्तमानपत्र विकून आणि ऑटो टॅक्सी चालवून उत्तर भारतीय समाजच मुंबईकरांचे जीवन चालवितो... उत्तर भारतीय समाज स्वतःच्या खांद्यावर मुंबईकरांचे ओझे वाहतो... जर एके दिवशी उत्तर भारतीयांनी ठरवलं की आज कामावर जायचं नाही आणि फक्त एक दिवस काम केलं नाही तर पूर्ण मंबई ठप्प होईल... मुंबईच्या लोकांना जेवायलाही मिळणार नाही... आमची तशी इच्छा नाही... मात्र त्यासाठी आम्हाला मजबूर करू नका,” अशी धमकीच संजय निरुपम यांनी दिली.

काय आहे गुजरातमधील प्रकरण?

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका बिहारच्या व्यक्तीला अटक केली आहे. घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिहारच्या रवींद्र साहू नावाच्या एका व्यक्तीला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. परराज्यातील लोकांवर हल्ल्याप्रकरणी गुजरातमध्ये विविध जिल्ह्यात आतापर्यंत 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.