पुणे/शिर्डी : आजकाल चोरीच्या घटना वाढत आहेत. चोरीच्या घटनांसोबत चोरीचे वेगवेगळे प्रकार देखील समोर येत आहेत. एटीएममधील पैसे चोरीच्या घटनांसोबत आता चक्क अख्खे एटीएम मशीनच चोरून नेल्याच्या घटना घडत आहेत. पुण्यातील येवत आणि शिर्डीजवळील संगमनेरमध्ये काल रात्री एटीएम मशीन चोरी गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये जवळपास 50 लाख रुपये लुटले असल्याची माहिती आहे.


यवतमध्ये पोलीस स्टेशनजवळ एसबीआयचे एटीएम लुटले
यवत येथील पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला असणारे एसबीआयचे एटीएम शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेले. या प्रकारामुळे यवत परिसरात खळबळ उडाली आहे. या एटीएममधून सुमारे 30 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची प्राथमिक माहिती यवत पोलिसांनी दिली आहे .

चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील संपूर्ण मशीनच लंपास केली आहे. या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.  दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हा प्रकार पोलीस स्टेशनपासून नजीकच्या परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

संगमनेरमध्ये महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन लांबविले
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर चोरट्यांनी 17 लाख रुपयांसह एटीएम मशीन घेऊन पोबारा केला. मध्यरात्रीची दोन वाजता चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेचे एटीम मशीन लांबविले.  एटीएममध्ये होते 17 लाख रुपये होते. दरम्यान पोलीसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याचवेळी तालुक्यातील वडगाव पान गावातील बँक ऑफ बडोदाच एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.


मध्यरात्रीच्या दरम्यान एटीएमजवळ कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मशिन फोडता न आल्याने त्यांनी थेट मशीन उचलूनच पोबारा केला आहे. या एटीएम मध्ये जवळपास 17 लाख रूपयांची रक्कम होती.

दुसरीकडे वडगाव पान गावातील एक एटीएम फोडण्याच्या तयारीत असताना नागरिकांच्या हालचाली समजल्यानंतर चोरटे पसार झाले. चोरीची घटना घडल्याची माहिती मिळताच संगमनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठसे तज्ञ आणी डॉग स्कॉडच्या मदतीने चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जातोय.