Solapur :  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड ( Praveen Gaikwad) यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेला (Deepak Kate) जामीन मंजूर झाला आहे. या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. दीपक काटेच्या कृत्यात अक्कलकोटचे पोलीस अधिकारी देखील सहभागी असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोघे पाहुणे आहेत. त्यामुळं आरोपीला पोलिसांनी मदत केल्याचा गंभीर आरोप मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी केला आहे.  

Continues below advertisement


या प्रकरणातील 8 आरोपी अद्यापही फरार


दरम्यान या प्रकरणातील 8 आरोपी अद्यापही फरार असून स्थानिक लोकांचा सहभाग असताना त्यांना आरोपी करण्यात आलेलं नाही. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात यावा यासाठी उद्या अक्कलकोट बंदची हाक आम्ही दिली असल्याचे माऊली पवार म्हणाले. उद्याचा बंद पूर्णपणे यशस्वी होईल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना आमच्यासोबत बंदमध्ये सहभागी होणार आहेत.  सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शाम कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 


नेमकं प्रकरण काय?


प्रवीण गायकवाड यांना रविवारी (13 जुलै) अक्कलकोट (Akkalkot) येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली होती. अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कारनिमित्त प्रवीण गायकवाड हे रविवारी पत्नीसह अक्कलकोटला आले होते, यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती मिळाली आहे.  दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे. 


18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक


प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाईफेक विरोधात 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची ( Akkalkot bandh) हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच फरार आरोपींना तात्काळ अटक करा, सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


अक्कलकोट बंदची घोषणा, आरोपींवर मोक्का? सोलापुरातील मराठा समाजाच्या बैठकीत काय-काय ठरलं?