मुंबई : लोकल सुरु करा नाही तर आंदोलन करू असा थेट इशारा भाजपनं सरकारला दिलाय. लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांनाच पडलाय. पण येत्या महिन्यात लोकल सुरु झाली नाही तर लोकलवरून राजकीय मंडळी भिडणार असं चित्र निर्माण झालंय. राज्यात ट्रेन कधी सुरु करायची यावर अद्याप निर्णय झाला नाही. नेत्यांमध्ये एकमत नाही, पण सामान्य माणूस यात भरडला जातोय.
कधीही न थांबणारी लोकल कोरोनानं थाबंवली. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास बंद करण्यात आला. आता लोकल प्रवास कधी सुरू होणार, याची सर्वसामान्य वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सुरू करावी, असा सूर आता समाज माध्यमातून येऊ लागला आहे. आता विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरण्याची तयारी केलीय.
काय म्हणाले प्रविण दरेकर?
ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांना रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा दिली नाही तर प्रत्येक स्टेशनवर आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला आहे. आज लोक खुप लांबून टॅक्सी, प्रायव्हेट गाडीनं प्रवास करतात. ज्यामध्ये त्यांचे खुप पैसै खर्च होतात. आता हे सगळं सहनशक्तींच्या पलिकडे गेले आहे. त्यामुळे आठवड्याभरात निर्णय झाला नाही तर स्टेशनवर आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले निर्बंध आता शिथिल होण्याची चिन्हे आहे. राज्यातील घटती रुग्णसंख्या, दुकाने, हॉटेल्सवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने कसे हटवता येतील, याबाबतचा सविस्तर अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. यावर लवकरच निर्णय होणार असून, येत्या ऑगस्टपासून अमंलबजावणी होणार असल्याचं कळतंय. पण 70 टक्के लसीकरणाशिवाय लोकल सुरु करण्याचा विचार नसल्याचं पालकमंत्री अस्लम शेख म्हणत आहेत.
आतापर्यंत किती लसीकरण झालं?
मुंबईत आतापर्यंत एकूण 67,72, 364 लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. पहिला डोस 57.63 टक्के लोकांनी घेतलाय. दुसरा डोस 17.60 टक्के लोकांनी घेतलाय. याच गतीनं लसीकरण होत राहीलं तर 70 टक्के लसीकरणाच्या अटीपर्यंत पोहोचायला अजुन किमान एक वर्ष तरी लागेल अशी शक्यता आहे
- पहिला डोस- 51,87,551 - 57.63%
- दुसरा डोस- 15,84,813 - 17.60%
- एकूण- 67,72, 364
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मागितला होता. राज्यातील पॉझिटिव्हीटी दर, बेड्सची संख्या आणि इतर काही निकषांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर आता राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये दुकानं, हॉटेल्स ट्रेन आणि इतर वेळ वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. पण येत्या महिन्यात लोकलवरून राजकारण तापणार एवढं नक्की आहे.