Nagpur News : प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar)  याच्यावर इंद्रजीत सावंत इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना फोनवर धमकावल्याचे आणि महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप आहे. मात्र त्याच प्रशांत कोरटकरने नागपूर पोलिसांच्या(Nagpur Police) सायबर सेलमध्ये लेखी तक्रार देऊन माझे मोबाईल हॅक करून इंद्रजीत सावंत यांना कॉल करण्यात आल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही माझा फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. या वेळेला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून माझा आवाज वापरून सावंत यांना कॉल करण्यात आल्याचा संशय कोरटकरने त्याच्या तक्रारीत व्यक्त केला आहे.


माझा मोबाईल हॅक करणाऱ्या आणि हा कॉल करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी ही कोरटकरने नागपूर सायबर सेलकडे दिलेल्या लेखी तक्रारीत केल्याची माहिती आहे. दरम्यान, नागपूर सायबर सेलने नागपूरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यासारखंच मोबाईल हॅक केल्याची तक्रार कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग (सोपविली)केली आहे.


सीबीआयने ब्लॉक केलेली आलीशान गाडी  प्रशांत कोरटकरकडे कशी?- सीआयडी


दुसरीकडे, प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस गाडी जप्त करायच सीआयडेने ठरवलंय. प्रशांत कोरटकर सध्या मध्य प्रदेशातील इंदौर भागात फरार असल्याची माहिती सीआयडीकडे (CID) आहे.  प्रशांत कोरटकरकडे असलेली ही आलीशान रोल्स रॉईस कार हजारो रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर आहे. मोतेवारला 2015 साली अटक झाल्यानंतर त्याच्या मालमत्ता आणि गाड्या जप्त झाल्या. मात्र आश्चर्य म्हणजे सात ते आठ कोटी किंमत असलेली ही गाडी जप्त झाली नाही. मात्र ही गाडी कोणाला विकता येऊ नये म्हणून सीबीआयने ही गाडी ब्लॉक केली होती. मात्र तरीही गाडी प्रशांत कोरटकरकडे कशी आली? हा प्रश्न आहे.


सीआयडी ने या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केल्याने काही पोलीस अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यताय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर आणि नागपूरमधे गुन्हे दाखल आहेत. कोल्हापुरातल्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला असला तरी नागपूरच्या प्रकरणात तो फरार आहे.


मुख्यमंत्र्यासमोर आंदोलन करण्यावर शिवप्रेमी आणि इंडिया आघाडी ठाम 


प्रशांत कोरटकरने दिलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्यावर शिवप्रेमी आणि इंडिया आघाडी ठाम असल्याची माहिती पुढे आली आहे. उद्या(6 मार्च) देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून प्रशांत कोरटकरला 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळाला असल्याने आंदोलन स्थगित करा, अशी पोलिसांनी विनंती केली आहे. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांसोबत पोलिसांनी बैठक केली आहे. मात्र, प्रशांत कोरटकर बरोबरच केशव वैद्य याच्यावर देखील कारवाई करा, अशी आंदोलकांची मागणी आहे. 


हे  ही वाचा