सोलापूर : लोकसभेत सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर आता विधानसभेत त्यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोलापूर मध्य विधानसभा क्षेत्रात बहुसंख्य असलेल्या मुस्लिम समाजाने देखील उमेदवारीवर आपला हक्क सांगितला आहे. मध्य विधानसभेत मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. मुस्लिम समाजाला आजपर्यंत काँग्रेसने मध्य विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली नाही. या निवडणुकीत मुस्लिम समाजाला हे तिकीट देण्यात यावे अशी मागणी मुस्लिम समाजतर्फे करण्यात आली आहे.
माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक ऍड. यु. एन. बेरिया यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे ही मागणी केली आहे. तर यापूर्वी जाममुनी मोची समाजाने ही बैठका घेत उमेदवारी समाजाला देण्याची मागणी केली आहे. मोची आणि मुस्लिम समाज हा पूर्वीपासून काँग्रेसची व्होट बँक समजला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या समाजांचे काँग्रेसला पाठबळ आहे. आता विधानसभेत या समाजांनी उमेदवारीचा आग्रह धरल्याने प्रणिती शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांना पराभूत करत शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदेंनी दोन वेळा नेतृत्त्व केलं आहे. या मतदारसंघात मुस्लिम आणि मोची समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे या समाजाच्या उमेदवारांनी आता या जागेवर दावा केल्याने प्रणिती शिंदेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
प्रणिती शिंदे यांनी नुकतेच सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची भेट घेतली होती. ही भेट चर्चेचा विषय झाली आहे. सोलापूरमध्ये येत असलेला मोहोळ हा मतदारसंघ राखीव असून तो राष्ट्रवादीकडे आहे. तसेच तो मतदारसंघ सुरक्षित असल्याने त्याठिकाणाहूनही प्रणिती शिंदे उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ, उमेदवारीवर मोची आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवारांची दावेदारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2019 09:17 PM (IST)
अनेक वर्षांपासून या समाजांचे काँग्रेसला पाठबळ आहे. आता विधानसभेत या समाजांनी उमेदवारीचा आग्रह धरल्याने प्रणिती शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -