परभणी : "जगात जर्मनी अन भारतात परभणी" अशी म्हण परभणी बाबत प्रचलित आहे. मात्र खरंच तुलना करायची ठरवली तर जर्मनीच्या 'ज' ची तरी आपण बरोबरी करू शकतो का? याचा विचार परभणी विधानसभा मतदार संघातील मतदार आणि नेत्यांनी करायला हवा. कारण मराठवाड्यातील सर्वात जुनं शहर आजही बकाल अवस्थेतच आहे. इथे विकास झाला नसल्याच्या गप्पा मारल्या जातात अन निवडणूक आली की "खान पाहिजे का बाण" हाच भावनिक मुद्दा समोर आणून निवडणूक लढली जाते. यंदाही काही वेगळी परिस्थिती आहे असं चित्र नाही त्यातच काँग्रेस शिवसेनेचं तगडं आव्हान पेलणार का? असा प्रश्नही सध्याच्या काँग्रेसच्या परिस्थितीवरून चर्चिला जात आहे.

एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेला परभणी विधानसभा मतदार संघ 1972 ला रावसाहेब जामकरांनी जिंकून काँग्रेसचा पहिला आमदार होण्याचा बहुमान मिळवला. सलग दोन वेळा आमदार झाल्यानंतर रावसाहेब जामकर यांना मंत्रिपदही मिळाले. यांनतर 1980 साली काँग्रेसकडून अब्दुल रहमान खान यांनी निवडणूक जिंकली. यांनतर आजतागायत काँग्रेसला इथे आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. 1985 ला झालेल्या निवडणुकीत शेकापकडून विजय गव्हाणे हे आमदार झाले. याच काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे यांचा झंजावात पोचला होता. 1990 ला झालेल्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसला आणि हनुमंत बोबडे यांनी शिवसेनेकडून काँग्रेसच्या आयेशा इकबाल यांचा पराभव करून शिवसेनेचं जणू या मतदार संघावर नावच कोरलं. 1990 ते 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत इथं शिवसेनेचाच विजय झाला. हा होता या मतदार संघाचा इतिहास.

परभणी विधानसभा मतदार संघात मराठा मतांबरोबरच मुस्लिम मतदार  बहुसंख्य आहेत. त्यामुळेच इथे 1990 ते 2014 दरम्यान झालेल्या 6  निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार हा मराठा तर 3 निवडणुकीत काँग्रेसचा मुस्लिम आणि 2 निवडणुकीत काँग्रेसचेच बंडखोर अपक्ष मुस्लिम अशीच सरळ मराठा विरुद्ध मुस्लिम लढाई इथं झाली. याच लढाईत इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला. केवळ 2004 ला शिवसेनेचे संजय जाधव आणि काँग्रेसकडून अशोक देशमुख यांच्यात लढत झाली ज्यात संजय जाधव यांनी विजय मिळवला होता. 1990 नंतर ही एकच निवडणूक अशी झाली जिथे दोन्ही उमेदवार हे हिंदू होते हे विशेष.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आणि आपापले उमेदवार  उभे केले. ज्यात शिवसेनेकडून पहिल्यांदाच उभे असलेले डॉ राहुल पाटील, भाजपचे आनंद भरोसे, काँग्रेस इरफानूर रहमान खान, राष्ट्रवादी प्रताप देशमुख आणि एमआयएमकडून सय्यद खालेद सय्यद साहेबजान उर्फ सज्जूलाला अशी पंचरंगी निवडणूक झाली यात राहुल पाटील यांनी एमआयएमच्या सय्यद खालेद सय्यद साहेबजान उर्फ सज्जूलाला यांचा 26 हजार 526 मतांनी पराभव केला तर भाजपकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या आनंद भरोसे यांनीही 42 हजार मते घेऊन भाजपच्या आशा वाढवल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे मात्र चांगलेच पाणीपत झाले. 4 नंबरला राष्ट्रवादी तर 5 नंबरला काँग्रेस गेल्याने यंदाची निवडणूक काँग्रेससाठी खडतर असणार आहे.

पक्ष कुठलाही असो वाद असतातच आणि त्यात परभणी शिवसेनेत अंतर्गत वाद हा मोठा आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव  आणि आमदार डॉ राहुल पाटील यांच्यात मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर बेबनाव आहे. अनेक वेळा दोघांमध्ये चांगलीच खडाजंगीही झाली. थेट मातोश्रीपर्यंत हा वाद पोचलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटले. स्वतः आमदार राहुल पाटील शिवसेनेच्या प्रचारात दिसले मात्र राहुल पाटील यांचे समर्थक मात्र दिसले नाहीत.  शिवाय शिवसेनेच्याच परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना तब्बल 29 हजार मताधिक्याने पिछाडीवर राहिल्याने खासदार संजय जाधव आणि आमदार यांच्यात अजूनच टोकाचे मतभेद वाढले आहेत. त्यामुळे लोकसभा जिंकलेले खासदार संजय जाधव हे या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने 2014 साली आनंद भरोसे यांच्या रूपाने परभणी विधानसभा निवडणूक लढवली ज्यात त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. पहिल्याच निवडणुकीत भरोसे यांनी 42 हजार मत घेऊन भाजपला संजीवन दिली. या निवडणुकीनंतर त्यांनी आपले काम कायम सुरूच ठेवले आहे. भरोसे आणि आमदार डॉ राहुल पाटील यांच्यात विस्तवही जात नाही. भाजप-सेनेची युती जरी असली तरीही 5 वर्ष परभणीत युती असल्याचे जाणवले नाही. महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीला पडलेल्या भरघोस मताधिक्याचा मुद्दा घेऊन भरोसे यांनी आपल्या समर्थकांसह ही जागा भाजपला सोडण्याची मागणी पक्षाकडे केलीय. त्याला शिवसेनेतील बंडखोरीचीही जोड दिली आहे. परभणीची जागा भाजपला सोडण्याची मागणी करीत असतानाच युती झाली तरी आपण निवडणूक लढवणारच या भूमिकेवर भरोसे ठाम असल्याने शिवसेना यावेळी चांगलीच अडचणीत सापडली आहे.

आघाडीत ही जागा आजपर्यंत काँग्रेसकडे आहे मात्र काँग्रेसला इथे अजूनही यश आलेले नाही मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 5 तर राष्ट्रवादी 4 नंबरला राहिल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा सोडवून घेण्याची मागणी पक्षाकडे केली आहे तर कॉंग्रेसमधून अनेक जण आजही ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र असे असले तरीही शिवसेनेचे आव्हान तगडे असल्याने काँग्रेस इथे नेमका  कोण उमेदवार देणार? का जागा राष्ट्रवादी सोडवून घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीनेही विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. मागच्या निवडणुकीत इथे एमआयएमच्या उमेदवाराने शिवसेनेला चांगलीच टक्कर देऊन दुसरा नंबर गाठला होता. त्यावेळी केवळ मुस्लिम मतेच त्यांच्या बाजूने असल्याने इथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मुस्लिम, दलित, ओबीसी आदी घटक जर वंचित आघाडीच्या पाठीमागे राहिल्यास या मतदार संघांचा निकाल हा वेगळा लागू शकतो.

परभणी मतदार संघावर दृष्टीक्षेप

विद्यमान आमदार डॉ राहुल पाटील
पक्ष-शिवसेना
शहर आणि परभणी तालुका
एकूण गाव - 56
एकूण मतदार- 3 लाख 1 हजार 208

गंभीर प्रश्न

-शहर आणि ग्रामीण पाण्याचा प्रश्न
-रखडलेली पाणी पुरवठा योजना
-एमआयडीसी तील बंद उद्योगधंदे
- बेरोजगारी,शैक्षणिक सुविधांची वानवा
-एकमेव असलेले नाट्यगृह (नटराज रंग मंदिर) बंद
-बाह्यवळण रस्त्याचे रखडलेले काम
-आरोग्य सुविधेचा गंभीर प्रश्न
-वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न कायम
-शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न
-कचऱ्याचा गंभीर प्रश्न
-भूमिगत गटारांचा रखडलेला प्रश्न