Pandharpur Nagarpalika Election : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतील (Pandharpur Nagarpalika Election) नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या स्नुषा डॉक्टर प्रणिती भगीरथ भालके (Praniti Bhalke ) यांची उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी दिली आहे. आज डॉक्टर प्रणिती भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेस काही ठिकाणी आघाडीत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार : प्रणिती शिंदे
सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका व एक नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस काही ठिकाणी आघाडीत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार असून उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने उद्या हे चित्र स्पष्ट होईल असेही प्रणिती शिंदे यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये भाजपला रोखण्यासाठी सर्वच पक्ष एकत्रित आले असून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांनी एकत्र येत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केली आहे. याच्या माध्यमातून भाजपला पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तेवरून खेचण्यासाठी डॉक्टर प्रणिती भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
प्रणिती भालके या भाजपासाठी खूप मोठे आव्हान ठरणार
डॉक्टर प्रणिती भालके या भाजपासाठी खूप मोठे आव्हान ठरणार असून त्यामुळेच अजूनही भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केलेले नाही. भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, मनसे यासह विविध संघटना डॉक्टर भालके यांच्या पाठीशी उभे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. काही भागात महायुती एकत्र लढत आहे तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर महाविका आघाडी देखील काही ठिकाणी एकत्र आणि काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. अशातच पंढपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मात्र, महावाकिस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले आहेत. भाजपच्या विरोधात सर्वांना आघाडी केली आहे. त्यामुळं यावेळी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासा सुरुवात झाली आहे. उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं महायुतीकडून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.