सांगली : धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शिफारशीची भाषा करत आहेत. धनगर समाजाला फसवण्याचा उद्योग असल्याची टीका धनगर समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. धनगर समाजाला आता आरक्षण द्यावे अन्यथा या सरकारचे निवडणुकीत पानिपत करु, असा इशारा शेंडगे यांनी समस्त धनगर समाजाच्या वतीनं राज्य सरकारला दिला.


धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. रविवारी सांगलीच्या नागज येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन धनगर समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.


आमचे सरकार आल्यास धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. केवळ तोंडी आश्वासन नाही तर लेखी स्वरुपातील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र तेच मुख्यमंत्री आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्यात येईल, असं आश्वासन देत आहेत, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.


सत्तेत आल्यानंतर सरकारने चार वर्षात धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतच पाऊल उचलेलं नाही. तसेच आरक्षण देण्याच्या नावाखाली टाटा सोशल इन्स्टिट्यूटचा अहवाल तयार केला आणि तो अहवालही आता सरकारने लपवून ठेवला आहे, असा आरोप शेंडगे यांनी केला.


धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला हटवून तुम्हाला सत्तेत आणलं. त्यामुळे धनगर समाजाला आता तातडीने आचारसंहिता लागण्याआधी आरक्षण द्यावे, अन्यथा पुढील निवडणुकीमध्ये तुमच्या सरकारच पानिपत करु, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.