मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने गंभीर रुप धारण केलं आहे. काल (गुरुवारी 26 मार्च) राज्यात तब्बल 35 हजार 952 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर 111 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे आवश्यक आहे. याच संदर्भात आता महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार लसीचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिलंय.


केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिलीय. "केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. विके पॉल यांच्याशी चर्चा केली, त्यांनी महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार/प्रत्यक्षातील लसीकरणानुसार कोविड लसीचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिलंय. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी आता लसीकरण सध्या आहे त्यापेक्षा दुप्पट करावं." असं ट्वीट प्रकाश जावडेकर यांनी केलंय.






आधी महाराष्ट्रात लसीचा साठा शिल्लक असल्याचा दावा.. 
याआधी राज्य सरकारकडे लसीचा साठा शिल्लक असल्याचा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला होता. महाराष्ट्र शासनाने राज्यात पाठविल्या गेलेल्या एकूण 54 लाख लसींपैकी फक्त 23 लाख लस 12 मार्चपर्यंत वापरल्या आहेत. 56 टक्के लस वापराविना पडून आहेत. आता, शिवसेनेचे खासदार राज्यासाठी अधिक लस देण्याची मागणी करत आहे. पहिल्यांदा साथीचा आजार रोखण्यात अपयश आता लसीकरणातही ढिसाळ कारभार, अशी टीका जावडेकर यांनी केली होती.






लसीकरण केंद्राची संख्या दुप्पट करणार : अजित पवार
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता सध्या 50 टक्के खाजगी रुग्णालयाचे बेड ताब्यात घेतले आहे. परिस्थिती गंभीर असून आता नाईलाजास्ताव कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्र  दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण केंद्राची संख्या 300  वरून 600 वर करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी लसीचे अतिरिक्त डोस पुरवण्याची मागणी केली आहे. प्रकाश जावडेकरांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


कोणाचा दावा खरा?
आधी महाराष्ट्रात कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे, असं म्हणणारे प्रकाश जावडेकर आता लस पुरवठा करणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे नेमका कोणता दावा खरा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.