सांगली : सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची द्राक्ष व्यापारी आणि दलालांकडून फसवणूक होत असल्याचे प्रकार पुन्हा घडले आहेत. आता तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची द्राक्ष दलालाने तब्बल 31 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चार दलालांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


तासगाव तालुक्यातील खुजगाव आणि सिद्धेवाडी इथल्या दहा शेतकऱ्यांची 31 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. महेश सुभाष पाटील (रा. खुजगाव, ता. तासगाव) यांनी फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रामा चौगुले, परमेश्वर चौगुले, अमित चव्हाण (रा. कवठेमहांकाळ) आणि अमोल पाटील (रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दलालांनी तक्रारदार महेश पाटील यांच्याकडून गेल्या हंगामात द्राक्ष खरेदी केली होती. मात्र द्राक्ष नेल्यापासून हे दलाल पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होते. गेल्या काही दिवसांपासून या दलालांनी संपर्कच तोडला होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. 


राजेंद्र पवार, अरविंद दुबोले, पंडित पवार, शामराव चव्हाण, प्रकाश पवार, गुंडा चव्हाण, दिनकर चव्हाण आणि संतोष जाधव या शेतकऱ्यांकडून द्राक्षांची खरेदी केली होती. या शेतकऱ्यांचेही पैसे दिलेले नाहीत. त्यांचीही फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, दरवर्षी द्राक्ष दलालांकडून द्राक्ष उत्पादकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजार समित्या आणि द्राक्ष बागायतदार संघाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


दरम्यान याआधीही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडल्याने दलालांच्या ओळखपत्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. थोडे पैसे देऊन, गोड बोलून लाखो रुपयांना शेतकऱ्यांची फसवणूक करुन दलाल पळून जातात. या दलालांची नावं, पत्ता माहित नसल्याने त्यांना शोधायचं कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांकडून तहसीदार, बाजारसमिती, पोलीस यांना निवेदन देऊन दलालांना ओळखपत्र देण्याची मागणी केली जाते. द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रबोधन सुरु आहे. आता शेतकऱ्यांनीच द्राक्ष व्यवहार करण्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.