Prakash Ambedkar : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार की नाही? चर्चा सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला, तरी वंचित आणि महाविकास आघाडी सुरूच आहेत. दुसरीकडे संजय राऊत यांनी दिलेल्या संकेतांमधून ही चर्चा फिस्कटल्याचे सुद्धा दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर माझा कट्ट्यावर आले. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये नेमक्या किती जागांवरती अजूनही थेट घमासान सुरू आहे याची माहिती दिली. 



यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे आणि काँग्रेसमध्ये दहा पैकी तीन जागांवर वाद सुटला असून अजूनही सात जागांवर वाद सुरू असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यापैकी पाच जागांवर तिन्ही पक्षांचा दावा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्या जागा आम्ही जिंकू शकतो, असेही ते म्हणाले. नेमक्या जागा कोणत्या आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण अजूनही लांब राहिल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना अजूनही महाविकास आघाडीत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटलं आहे. अजूनही आम्हाला मार्ग निघेल अशी आशा असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


दरम्यान, 27 जागांच्या मागणीवरून प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी मी 12-12 जागांचा प्रस्ताव दिला होता, असे सांगितले. मात्र, यावेळी महाविकास आघाडीमधील पक्षाच्या नेत्यांकडून आम्ही कमी आहोत का? अशी विचारणा करण्यात आली. दरम्यान ही चर्चा ठीक होत नसल्याने उद्धव ठाकरे यांना आपण दोघे लढू असाही प्रस्ताव दिला होता, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आम्ही दोघेच लढलो तर 30 ते 35 जागा आरामात काढू असे ठाकरे यांना बोललो असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना सांगितले.