मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना जीवे मारण्याची धमकी सोशल मीडियातून दिली जाते आणि पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेतात असा आरोप भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. आज मुंबईत प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फेसबुक पोस्टचा आधार घेत त्यांनी संभाजी भिडे महाराजांवर पुन्हा निशाणा साधला आहे.


कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब पाटील नावाच्या व्यक्तीच्या फेसबुक पोस्टचा आधार देत भिडे गुरुजींवर निशाणा साधला आहे. रावसाहेब पाटील हे संभाजी भिडे गुरुजींचे हस्तक असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री आणि गिरीष बापट यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे.

यात भीमा कोरेगावसाठी आकडा कमी पडत असेल तर गिरीष बापट आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही बिनधास्त कापू शकता, असं या पोस्टमध्ये म्हटल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ही पोस्ट 1 जानेवारीला करण्यात आली असून ती भिडे गुरुजींच्या हस्तकाने केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं आहे, जे योग्य नाही, मुंबईत 16 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे, जी कुणीतरी पोलिसांना सांगितलं म्हणून करण्यात आली आहे.

तसंच योगेश प्रल्हाद नावाचं कंधारचा विद्यार्थी या हिंसाचाराचा बळी ठरला, ज्याला पोलिसांच्या लाठीमारामध्ये मृत्यू आला. ज्या पोलिसाची लाठी योगेशला लागली त्याची ओळख पटली आहे. मात्र तपासणीसाठी ही लाठी जप्त केली जात नाही. पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

व्हिडीओ : प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद