लातूर : महावितरणच्या चुकीच्या वीज बिलामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने वेळोवेळी कार्यलयात अर्ज विनंत्या केल्या. मात्र तरीही सुधारणा होत नसल्याने हतबल शेतकऱ्याने कार्यालयातच विष पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. शहाजी राठोड असे शेतकऱ्याचे नाव आहे.


शहाजी राठोड हे एकंबीतांडा येथील रहिवासी आहेत. लातूरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महावितरणने चुकीचे वीज बिल दिल्याने शहाजी यांनी अर्ज विनंती करुन वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही आणि त्याउलट वीज बिलासाठी तगादा लावला. याचा जाब विचारण्यासाठी शाहाजी काल उजनीच्या कार्यलयात गेले. मात्र अधिकारी काहीच दखल घेत नसल्याचे लक्षात आले, त्यामुळे शहाजी संतप्त झाले.

संतप्त आणि हतबल झालेल्या शाहाजी यांनी बाजूच्या दुकानातून रिगर नावाचे विषारी औषध आणले आणि महावितरणच्या कार्यलयातच प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शहाजी राठोड यांच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहाजी यांच्या गावातील त्यांच्या घराला कालपासून कुलूप आहे. कारण घरातील कमावत्या व्यक्तीने असा प्रकार केल्याने घरातील सर्वच लोक घाबरुन गेले आहेत. दवाखान्यासमोर बसून नशिबाला दोष देत बसले आहेत.

शाहाजी यांच्याकडे वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे. दोन भावांमध्ये ही जमीन आहे. आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी गावातच पिठाची गिरणी सुरु केली. मात्र त्याही ठिकाणी वीज वितरणने धोका दिला. गावात सिंगल फेज सुरु केली. गिरणी बंद पडली, त्यांचे लाईट बिल थकले. अशातच त्यांच्या शेतातील कृषी पंपाचे वीज बिल अचानकपणे 59 हजार रुपयांचे आले.

याबाबत शहाजी यांनी पाठपुरावा केला. मात्र दखल घेतली गेली नाही. ते सारखे वीज वितरणाच्या कार्यालयात जात होते. त्यातच गावातील डीपी नादुरुस्त झाला आहे. गावात पाणीपुरवठा बंद झाला आहे. एकाच गावात विजेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने हतबल आणि संतप्त झालेले शाहाजी काल कार्यालयात गेले, असे ग्रामस्थ सांगत आहेत.

याबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. शहाजी यांचा एकही अर्ज आला नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र केलेल्या अर्जाची एक प्रत तर शहाजी यांच्याकडे आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची मुजोरी आणि वसुलीचा तगादा लक्षात येतो आहे. हे सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे.