बीड : धनंजय मुंडे यांनी मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर पंकजा मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे, अशा हालचाली भाजपाच्या गोटामध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गोपीनाथ मुंडे यांचं भाजपमध्ये असलेले योगदान आणि पंकजा मुंडे यांचं पक्षासाठी केलेलं काम यामुळे पंकजा मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद दिले जाईल, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातच त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


एकीकडे 'अब की बार दो सो पार' अशी घोषणा दिल्यानंतरही भाजपला संभाव्य संख्याबळापर्यंत न पोहोचता न आल्याने कमी झालेल्या जागांची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या पराभवाची देखील चर्चा होत आहे.  परळी विधानसभा मतदारसंघातील लढत होती अत्यंत चुरशीची बनली होती.  या लढतीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा 30 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

खरंतर मास लीडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांचा परळीत झालेला पराभव हा भाजपसाठी  एक धक्का मानला जातोय.  पंकजा मुंडेंचा परळी मतदारसंघात जरी पराभव झाला असला तरी त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. तिथे नुकसान होऊ नये म्हणून भाजपकडून पंकजा मुंडे यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर केली जात आहे.

पंकजा मुंडेंचं मंत्रिपद कायम ठेवून मुंडेंना मानणारा समाज असलेल्या अहमदनगर, पुणे, नाशिक, बुलढाणा आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात याचा फायदा भाजपला मिळेल अशी चर्चा भाजपच्या गोटात ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने बीडमध्ये मोठा विजय मिळवला आहे. यापुढे  धनंजय मुंडे यांचे आव्हान थोपवण्यासाठी पंकजा मुंडे यांनाच भाजपकडून पुढे आणले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. त्यात पाथर्डीच्या मोनिका राजळे आणि रासपचे रत्नाकर गुट्टे यांचा समावेश आहे. पण पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतले जाण्याचीच जास्त  शक्यता आहे.