सांगली मनपा क्षेत्रातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरीक त्रस्त, आयुक्तांना अल्टीमेटम
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2017 12:21 PM (IST)
सांगली : पावसाळा सुरु होताच सांगलीतले रस्ते खड्ड्यात गेल्याचं दिसून येतं आहे. सांगली, मिरज, कुपवाड या तिनही शहरात रस्त्ये खड्डेमय झाल्याने, संतप्त नागरिकांनी आयुक्तांना अल्टीमेटम दिला आहे. खड्डे बुजवले नाहीत तर लोकसहभागातून खड्डे बुजवण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. गेल्यावर्षी पावसात रस्त्यांची चाळण झाल्यानंतर पालिकेकडून यंदा चांगले रस्ते देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र वर्षभर टाळाटाळ केल्यानंतर पालिकेनं पावसाच्या तोंडावर रस्त्यांची कामं काढली. आणि त्याआधीच आलेल्या पावसानं रस्त्यांची पुन्हा एकदा चाळण झालीय. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी खड्डेमय रस्त्याचा फटका मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांना बसला होता. सुरेश खाडे यांच्या इंग्लिश मीडियम स्कूलची बस खड्ड्यात आडकली होती. यावेळी बसमध्ये विद्यार्थी नसल्याने, मोठी दुर्घटना टळली. रस्त्यांच्या दुरवस्थेने सांगली महापालिकेतील नागरिक त्रस्त आहेत. शहरातील शिवाजी मंडई, बसस्थानक, राममंदिर चौक, काँग्रेस कमिटी, आमराई रोड, पटेल चौक असे कित्येक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे खासगी वाहनचालकांसह रिक्षाचालक, एसटी बसेस, परिवहन बसेसचे चालकही या खड्ड्यांना प्रचंड हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिकेला खड्डे बुजवणं जमत नसल्यास, लोकसहभागातून खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेते शेखर माने यांनी दिला आहे.