मुंबई : 15 डिसेंबरपर्यंत खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी केली होती. मात्र डेडलाईन संपल्यावरही अनेक प्रमुख रस्ते खड्डेयुक्तच आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेची डेडलाईन गुरुवारी संपली. मात्र अद्यापही राज्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. खड्डे जैसे थे असल्यामुळे आता जर कुणी खड्डे दाखवले, तर त्यांना बांधकाम मंत्री हजार रुपये देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

वाशिम, बीड, सांगली, सातारा इथल्या रस्त्यांवर आजही खड्ड्यांचंच साम्राज्य पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यापैकी एक असलेल्या सांगलीहुन इस्लामपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आजही अनेक खड्डयाचं साम्राज्य पाहायला मिळतं, तर अनेक रस्त्याचं काम अजून सुरुच आहे.

त्यामुळे रस्त्यावर मधोमध असणारे हे खड्डे जो दाखवेल त्याला एक हजार रुपये मिळणार का याचं उत्तर बांधकाममंत्रीच देऊ शकतील. मात्र राज्यातील अनेक हायवेंवर खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे.