नवी दिल्ली : देशातील नव्या नोटांचा तुटवडा टाळण्यासाठी युद्धपातळीवर नव्या पाचशे आणि दोन हजारच्या नोटांची छपाई सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
देशात दोन लाख 20 हजार एटीएम आहेत. यापैकी दोन लाखांहून जास्त एटीएम्सचं रिकॅलिब्रेशन आतापर्यंत पूर्ण झालं आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल, असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं.
20, 50, 100 रुपयांच्या नोटांची छपाईही वेगाने सुरु आहे. शंभर रुपयांच्या 80 हजार कोटी किंमतीच्या नोटा बाजारात आहेत. यामुळे बाजारातील सुट्ट्या पैशांचा तुटवडा दूर होईल. तसेच दोन हजारच्या नोटेचे सुट्टे मिळण्यास मदत होईल, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.
जप्त केलेल्या नोटांचं काय?
देशभरात विविध ठिकाणी आयकर विभाग, पोलिस यांच्या कारवाईदरम्यान कोटींचं घबाड मिळत आहे. यामध्ये नव्या 2 हजारच्या नोटाही अनेक ठिकाणी आढळल्या आहेत. या जप्त केलेल्या नोटा देखील वापरात आणल्या जात आहेत, अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली.
पाचशेच्या नोटांचा पुरवठा वाढवणार : दास
दोन हजारच्या नोटा बाजारात पोहचल्या आहेत. मात्र अजूनही पाचशेच्या नोटेचं अनेकांना दर्शन झालं नाही. त्यामुळे पाचशेच्या नोटा अधिक छापण्यावर भर दिला जात असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली.
या नोटा दोन ते तीन आठवड्यात बाजारात येतील. नोटांचा पुरवठा करण्यासाठी देशभरात विमानाचा वापर केला जात आहे, अशी माहितीही शक्तिकांत दास यांनी दिली.
सहकारी बँकांमध्ये चलन पुरवठा वाढवणार : दास
अर्थ मंत्रालयाने सहकारी बँकांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा बँकांवरील बंदी उठवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती अॅटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे. त्यामुळे सहकारी बँकांमध्ये चलन पुरवठा वाढवण्यात येईल, असंही शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.