भगवान सहाय यांचं आणखी एक संतापजनक कृत्य
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 02:39 PM (IST)
मुंबई : कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय से बचाव असं म्हणण्याची वेळ सध्या कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांवर आली आहे. कारण मुलाच्या नैराश्याचं कारण दिल्यानंतरही सुट्टी नाकारणाऱ्या सहाय यांनी आणखी एक चीड आणणारा प्रकार केला आहे. मुलाच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या घाडगे यांच्या रजेचा अर्ज कोठे आहे? असा शेरा भगवान सहाय यांनी मारला आहे. त्यामुळे सहाय यांना तातडीने निलंबित करावं अशी मागणी कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. सांत्वन नाहीच, उलट शेरा मारला! मुलाच्या अंत्यविधीला गेलेले राजेंद्र घाडगे कामावर आले नाहीत म्हणून त्यांच्या सहाय्यकाने 16 ऑगस्ट रोजी भगवान सहाय यांना अर्ज पाठवला होता. परंतु घाडगे यांचं सांत्वन करणं दूरच, सहाय यांनी अर्जावर रजेचा अर्ज कोठे आहे?, असा शेरा मारला. घाडगेंची सुट्टी नाकारली, घरी मुलाने आत्महत्या केली कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांना त्यांच्या मुलाने फोन करुन घरी बोलावलं. घाडगे यांचा मुलगा नैराश्यात होता. घरी न आल्यास आत्महत्या करण्याची धमकीही घाडगेंच्या मुलाने त्यांना दिली होती. मात्र, भगवान सहाय यांनी घाडगेंना घरी जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे घाडगे मुलाच्या बोलावण्यानंतरही घरी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे मुलाने आत्महत्या केल्याचं समजतं आहे.