रत्नागिरी : अमरावती येथील व्याघ्र प्रकल्पातील रेंज ऑफिसर दिपाली चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच 30 वर्षीय महिला पोस्टमास्तरने कार्यालयातच आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूर्वी तुरे असं या 30 वर्षीय महिला पोस्ट मास्तरचं नाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
शनिवारी अर्थात 27 मार्च रोजी रात्री उशिरानं ही घटना समोर आली. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, पूर्वी यांनी आत्महत्या का केली? यामागचं कोणतंही कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे पूर्वी तुरे यांनी आपल्या कार्यालयातच गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील मोठी गोडीबाव येथील रहिवासी. त्या विवाहित होत्या. त्यांच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण असावं? याचा सध्या पोलिस तपास सुरू आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
काय घडलं त्या रात्री?
शनिवारी दुपारी दोन वाजता पूर्वी आपल्या पतीला पोस्टाच्या कामानिमित्त जाते असं सांगून बाहेर पडल्या. पण, सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी आल्याच नाहीत. त्यानंतर सर्वत्र चौकशी आणि शोधाशोध सुरू झाली. यावेळी मुरूड येथील पोस्ट ऑफिसचा दरवाजा आतून बंद असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना बोलावले गेले. खिडकीतून डोकावून पाहिले असता पूर्वी यांनी दोरीनं गळफास घेतल्याचं समोर दिसलं.
घडलेल्या घटनेची ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. या साऱ्या प्रकरणात आता पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. पूर्वी या मुरूड येथे येण्यापूर्वी कर्दे येथे होत्या. दरम्यान, पूर्वी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याचा सध्या पोलीस तपास सुरू आहे. पूर्वी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी देखील लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे पोलिसांना देखील आत्महत्येच्या कारणाचा शोध घेणं कठीण बनलं आहे.
दीपाली चव्हाण आणि डीएफओ शिवकुमार यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल