मुंबई : भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे. दरम्यान, शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्री आमचाच होईल, असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, असे पोस्टर लावण्यात आले आहे.


शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. आपला नम्र, शिवसैनिक असे या पोस्टवर लिहिण्यात आलेले आहे.मुंबईत मातोश्री परिसरात शिवसेनेकडून होर्डिंगबाजी सुरूच आहे. होर्डिंगमधून मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव पुढे करण्यात आलंय.  याआआधी हीच ती वेळ म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करण्यात आलं. तशी होर्डिंगबाजीही शिवसेनेकडून करण्यात आली. आता शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचं नाव पुढे करणार याकडं नजरा लागल्या आहेत.

भाजपकडून सत्तास्थापनेबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीहून शिवसेना आमदारांशी चर्चा करण्यासाठी मालडच्या रीट्रीट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. चर्चेनंतर आदित्य ठाकरे रीट्रीट हॉटेलमध्येच मुक्कामाला आहेत.

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची होर्डिंगबाजी | ABP Majha



राज्यपालांनी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. महाराष्ट्रातील 105 आमदार असलेला पक्ष म्हणून राज्यपालांनी आम्हाला निमंत्रण दिलं. कोअर कमिटीच्या बैठकीत निमंत्रणाच्या संदर्भात चर्चा झाली. बैठकीनंतर राज्यपालांना आपला निर्णय कळवणार आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.