मुंबई : उद्धव ठाकरेंनी आज मालाडमधील हॉटेल द रिट्रीटमध्ये जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. राज्यात आपलच सरकार बनणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच आतापर्यंत पालखीचे भोई होतो, आता भोई होणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपण अजूनही युती तोडली नसल्याचं म्हणत, युतीची दारं उघडे असल्याचंही त्यांनी सूचवल्याची माहिती समोर येत आहे.


तर दुसरीकडे राज्यपालांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातही हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपची कोअर कमिटीची आज बैठक पार पडली. या बैठकीची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्रातील 105 आमदार असलेला पक्ष म्हणून राज्यपालांनी आम्हाला निमंत्रण दिलं. कोअर कमिटीच्या बैठकीत निमंत्रणाच्या संदर्भात चर्चा झाली. पुन्हा दुपारी 4 वाजता बैठक घेणार आहोत आणि बैठकीनंतर राज्यपालांना आपला निर्णय कळवणार आहोत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.



...तर भाजप विरोधी पक्षात बसणार


भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अपक्षांची काही जुळवाजुळव होते का यासंदर्भात चर्चा झाली. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अमित शाह यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती त्यांना देण्यात आली. भाजपची सध्याची स्थिती पाहता अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन होणे शक्य नाही. त्यामुळे शिवसेना सरकार बनवत असेल, तर भाजपची विरोधी पक्षात बसायची मानसिकता झाली आहे. दुपारी 4 वाजताच्या बैठकीत या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना काय सूचना देतात याकडे भाजपचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदार भेटीनंतर पुन्हा भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. शिवसेनासोबत येत नसेल तर काय भूमिका घ्यायची यावर चर्चा करुन भाजप निर्णय घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


संबधित बातम्या