Jayant Patil : महाराष्ट्रात चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत देखील वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे चौथ्या लाटेला जर रोखायचे असेल तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केलं. सांगलीत महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस दलाच्या परेड ग्राऊंडवर आयोजीत केलेल्या सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. 


कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करुन आपण धैर्याने उभे आहोत. पण आता चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. या चौथ्या लाटेला उबंरठ्यावरच रोखायचे असेल तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेणे आवश्यक आहे. कोविडच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज करण्याचे निर्देश दिल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले. पण पुन्हा आपल्याला बंधने नको असतील तर आपण स्वयंशिस्त पाळणे अनिवार्य असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


महाराष्ट्राने समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. राज्यात असलेल्या महाविकास आघाडी शासनाने गेल्या अडीच वर्षात राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संकटांची मालिका सुरु असतानाही सर्व आघाड्यांवर लढण्यात, दिलासा देण्यात शासनाला यश आले आहे.  हे सरकार 'आपले सरकार' असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण करण्यात राज्य शासन यशस्वी झाले आहे असं देखील जयंत पाटील म्हणाले.


महाराष्ट्र हे स्वातंत्र, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांचा सन्मान करणारे राज्य आहे. आज कधी नव्हे एवढी प्रत्येकाने आपली सद्सद्  विवेकबुध्दी  जागृत ठेवण्याची  गरज निर्माण झाली आहे. आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह आपण पुढील काळातही प्राणपणाने जपूयात असे पाटील म्हणाले.  प्रत्येक कठीण परिस्थितीत आपला एकोपा टिकवूया. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्वल परंपरा अखंड ठेवूया, असे आवाहन जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त नागरिकांना केले.