बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला सध्या राजकीय वळण मिळालं आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे. पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बातचित करताना त्यांनी माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचं म्हटलं आहे. तसेच ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज होतं, असंही ते म्हणाले आहेत.
पूजा चव्हाणच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "खूप वाईट वाटलं. आम्ही तिथे साडेआठ-नऊच्या दरम्यान पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर कळालं की, पूजा आमच्यात नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ती बिल्डिंगवरुन पडली आहे आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिथे गेल्यावर कळालं आम्हाला ती आपल्यात नाही. ऐकल्यावर खूप धक्का बसला. काय करावं, काहीस समजत नव्हतं. तिथे माझ्यासोबत कोणीच नव्हतं. त्यानंतर नातेवाईक आले."
"मला बीपीचा त्रास आहे. त्यामुळे सर्व कामं, व्यवहार पूजा पाहायची. माझ्या मुलीच्या नावावर मी पोल्ट्री साठी कर्ज घेतलं होतं. जवळपास 17 ते 18 लाखांचं कर्ज होतं. लॉकडाऊनमुळे पोल्ट्री बंद झाली होती. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईकांकडून पैसे घेऊन सावरण्याचा प्रयत्न केला. तर बर्डफ्लू आला. त्यामुळे पूजा तणावात होती. एवढे पैसे फेडायचे कसे? हा तिच्यासमोर प्रश्न होता." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी पूजाला त्यावेळी धीर देण्याचा प्रयत्न केला होता. तिला मी सांगितलं होतं, मी आहे पूजा. पण ती म्हणायची, पप्पा मी काय करू? मी आता जाऊन क्लास करुन येते. मला इथे बसून टेन्शन खूप येतंय. पैसे एवढे द्यायचे कसे? बँकेचे मेसेज येत आहेत, हफ्ते भरायला सांगत आहेत."
पाहा व्हिडीओ : Pooja Chavan Suicide Case|मुलीच्या मृत्यूमुळे उठलेल्या वादंगावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया EXCLUSIVE
"आम्ही खूप निवेदनं दिली. कलेक्टरांना, तहसीलदारांनी, पण कुणीच लक्ष दिलं नाही. लक्ष दिलं असतं तर माझी मुलगी गेली नसती. पूजा कधीच स्वतःचं दुःख दुसऱ्याला दाखवत नव्हती. तिचा स्वभाव होता. दुःख न दाखवता बाजूला जाऊन ती रडायची गपचूप. कळू द्यायची नाही मी रडायची म्हणून. डोळे पुसून पुन्हा येऊन माझ्याशी बोलायची." , असं त्यांनी सांगितलं.
सध्या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "हे राजकारणंही असू शकतं. माझ्या मुलीला नाहक बदनाम केले जात आहे. कोणासोबत तरी माझ्या मुलीचं नाव जोडून काही लोक मुद्दामून आमची बदनामी करत आहेत. आमचा समाज म्हणतोय हे राजकारण आहे. माझी बदनामी होण्यासाठी. तो आवाजही आमच्या मुलीचा नाहीये. माझी मुलगी तर गेली ना, माझं काय आहे? पण आता माझी बदनामी थांबवली पाहिजे आता. त्यांना काय मिळतंय, काय साधत आहेत. ज्याला दुःख झालंय त्याला हे आणखी दुखवत आहेत. आई-वडिलांची अवस्था काय आहे. तिची आई बेशुद्ध आहे. कोणाला काय सांगावं काहीच कळत नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "खूप मोठा डोंगर आहे कर्जाचा. पैसे द्यायचे कसे? पोल्ट्री व्यवसाय बुडाल्यामुळे खूप वाईट परिस्थिती आहे. फक्त माझीच नाही, संपूर्ण भारतात अशीच परिस्थिती आहे."
कुणाचंही नाव घेणं चुकीचं आहे. उगाच विनाकारण कोणाचंही नाव का घ्यायचं : पूजाचे वडिल
वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जातंय यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "असं कुणाचंही नाव घेणं चुकीचं आहे. उगाच विनाकारण कोणाचंही नाव का घ्यायचं? पोलिसांचं काम आहे, ते चौकशी करु शकतात. काय खरं आहे, काय खोटंय. त्या ठिकाणी मुलं होती तेदेखील सांगतात की, ती खाली पडली आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. मी सुद्धा पाहिलं डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे." पोलिसांत काय जबाब दिला त्यासंदर्भात बोलताना पूजाच्या वडिलांनी सांगितलं की, "मला पोलिसांनी विचारलं होतं की, तुम्हाला कोणावर शंका आहे का? मी सांगितलं कोणावरच नाही."