नांदेड : येथील शिवशाही बसचा तेलंगाणा राज्यातील कामारेड्डी येथे भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते, त्यापैकी 17 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (शनिवारी) पहाटे बसचा भीषण अपघात झाला. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


नांदेड आगारामधील शिवशाही बस काल (शनिवारी) हैदराबादसाठी आगारातून रवाना झाली होती. आज पहाटे तेलंगाणा राज्यातील कामारेड्डी येथे सदर बसला भीषण अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावरुन खाली उतरुन पलटली. बस साधारण 2 ते 3 वेळा पलटी घेऊन रस्त्यावरुन खाली उतरली. अपघात इतका भीषण होता की, अपघातात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच बसमधील वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.


नांदेड आगारामधून निघालेल्या बसमधून एकूण 36 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात एकूण प्रवाशांपैकी 17 प्रवाशांना गंभीर जखमी झाले आहेत. इतर प्रवाशांपैकी काहीजण किरकोळ जखमी झाले असून सुखरुप आहेत. बसचा चालक आणि वाहकासह सर्व जखमी प्रवाशांना कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. प्रथमदर्शनी हा अपघात बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झाला असल्याचं समजत आहे.


दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील आगार व्यवस्थापक बिलोली घटनास्थळाकडे तत्काळ रवाना झाले आहेत. तेलंगाना राज्य परिवहन अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताची माहिती मिळतात, पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. सर्व जखमी प्रवाशांवर तेंलगणातील कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


जालन्यातील 'मौत का कुआं'; दोन दिवसात दोन गाड्यांना विहिरीत जलसमाधी, चौघांचा मृत्यू