मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा असा दबाब मुख्यमंत्र्यांवर वाढत असताना आता पोहरादेवीच्या मंहंतांनी मुख्यंमंत्र्यांना एक पत्र लिहलंय. संजय राठोड यांचा तडकाफडकी राजीनामा घेऊ नये अशी विनंती त्या पत्रात करण्यात आली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यास त्यांना पोहरादेवीवरुन शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा द्यायची विनंती करू असंही मंहंतानी सांगितलंय.
महंत जितेंद्र महाराज यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलंय की, "पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे. चौकशीतून सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये. जर त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला तर या ठिकाणी पोहरादेवीवरुन त्यांना आम्ही शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा द्यायला सांगू."
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात?
पोहरादवीच्या महंतानी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलंय. त्या पत्रात संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांवर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढत असताना आता पोहरादेवीमध्ये तीन महंतांची बैठक सुरु आहे. या बैठकीतून काय बाहेर येतंय याकडे सर्वांच लक्ष आहे.
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय चव्हाणांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. त्यासाठी शनिवारी राज्यभर आंदोलन केलं आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत राजधर्माची आठवण करुन दिली. मात्र त्यांचं हे ट्वीट कुणासाठी आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
आज जर संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यास ते पोहरादेवीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या ठिकाणाहूनच त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीची घोषणा होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.