पुणे : मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. दर दिवशी सदर प्रकरणी एक नवा खुलासा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आल्याचं कळत आहे.


सध्याच्या घडीला पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचं कळत आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच मृत्यु झाल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, पूजाच्या आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये तिच्या मणक्‍याला आणि डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण समोर येत आहे.


पूजाच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल वानवडी पोलिसांना यापुर्वी मिळाला होता. त्यामध्ये तिच्या डोक्‍याला आणि मणक्‍याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यु झाल्याचे नमूद केले होते. वानवडी पोलिसांनी यापुर्वीच ही बाब स्पष्ट केली होती.


Pooja Chavan Case | संजय राठोडांनी राजीनामा दिला, तसा धनंजय मुंडे यांनीही द्यावा : पंकजा मुंडे


दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मात्र पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


पाच कोटी घेतल्याच्या आरोपांवर पूजाचे वडील म्हणतात...


पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांनी संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतले असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणावर बोलणं मात्र पूजा चव्हाणच्या वडिलांनी टाळलं.


"आता कोण काय बोलतंय हे माहित नाही, आम्ही आमच्या दुःखात आहोत." मुख्यमंत्र्यांनी सांगूनही बदनामी थांबली नाही, अशी खंतही पूजाच्या वडिलांनी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच संजय राठोड यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या आजींबाबत बोलताना, त्या आमच्या दूरच्या नातेवाईक आहेत, मात्र आमच्यात कसलेच नातेसंबंध नाहीत, असं पूजाच्या वडिलांनी सांगितलं.