नागपूर :  'अवनी'ला मारण्याचे राजकारण केले जात असल्याचे सांगत सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागितला जातोय, तो चुकीचा आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांना क्लीनचिट दिली आहे. मुनगंटीवार चांगलं काम करत आहेत, असेही गडकरी यावेळी म्हणाले.


नागपूर येथे गडकरी यांनी अवनी वाघिणीला मारण्यावरून सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. कुठल्याही उद्योगपतींसाठी जमीन दिली जात नसल्याचेही ते म्हणाले. या वाघिणीनं 13 आदिवासींना मारले त्याबाबत कुणीही बोलत नाही, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

राज्यातील राजकारण्यांनी जे आरोप केले त्याबाबत कीव येत असल्याचे सांगत मुनगंटीवार यांचा राजीनामा मागितला जातोय, तो चुकीचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नरभक्षक टी1 वाघिणीला ठार केल्यानंतर आता राजकारण तापायला लागलं आहे. वन विभागाने बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीचा बळी घेतल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता.

वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी जर हिंसक बनत असेल तर त्याला बेशुद्ध करुन पकडणं, असा नियम आहे. मात्र अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आलं असून याचा आम्ही निषेध करत आहोत, असं जयंत पाटील म्हणाले होते. वन विभागाला ही हिंसक वाघीण दिसली मात्र वनक्षेत्रात लाकूड आणि प्राण्यांचे अवशेष चोरले जात आहेत याकडे मात्र या खात्याचे लक्ष नाही. वन विभागाने फक्त उद्योगपतींसाठी अवनी या वाघिणीचा बळी घेतला असून याचा जाब आम्ही वन्य अधिकारी आणि वन मंत्र्यांना विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.