जळगाव : हनी ट्रॅपबाबतच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र जळगावमध्ये चक्क एक बिबट्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. चाळीसगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नर बिबट्याला हनी ट्रॅप करुन जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.


बिबट्याला आकर्षित करण्यासाठी मादी बिबट्याचे मूत्र पिंजऱ्यात फवारण्यात आलं होतं. मादीच्या मुत्राच्या वासाने आकर्षित झालेला नर बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि वन विभागाच्या सापळ्यात अडकला. हनी ट्रॅप लावण्यासाठी औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानातील मादी बिबट्याच्या मूत्राचा वापर करण्यात आला होता.


वडगाव लांबे येथील राजेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या नागरी वस्त्यांमध्ये जाऊन पाळीव जनावरांवर हल्ले करायचा. शिवाय दिवसरात्र कोणत्याही क्षणी हा बिबट्या हल्ला करत असल्यानं शेतकरी वर्गात मोठी दहशत पसरली होती.


अतिशय चलाख असलेला या नर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जागोजागी सापळे लावले, मात्र बिबट्या काही हाती लागत नव्हता. केवळ पिंजऱ्याजवळ नव्हे तर अनेकदा बिबट्या थेट पिंजऱ्यावर जाऊन बसत होता. त्यामुळे बिबट्याला जेरबंद कसं करायचं हा प्रश्न वन विभागाल पडला होता..


बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षित अशा जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती वन विभागानं दिली आहे.