Pandharpur: राजकीय नेत्यांच्या वारसदारांनी राजकीय एंट्री नेहमीच दमदार आणि फार मोठा गाजावाजा करून झालेली पाहायला दिसते. मात्र खासदार धनंजय महाडिक यांचा अमेरिका रिटर्न मुलाला राजकीय प्रवेशासाठी भीमा कारखान्याच्या धुळीने भरलेल्या आणि खड्ड्याच्या चाळणी असलेल्या रस्त्यातून फिरावे लागत आहे. भाजप राज्यसभेचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा सहकारी साखर कारखाना पंढरपूर तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे आहे. या कारखान्याची स्थापना खासदारांचे वडील दिवंगत भीमराव महाडिक यांनी केली होती. परंतु नंतरच्या काळात या कारखान्याची सत्ता दिवंगत सुधाकर परिचारक आणि राजन पाटील यांच्याकडे गेली होती . 10 वर्षांपूर्वी पुन्हा धनंजय महाडिक यांनी हा कारखाना जिंकून वडिलांनी स्थापन केलेली संस्था आपल्या ताब्यात घेतली होती. आता महाडिकांची तिसरी पिढी या कारखान्याच्या नेतृत्वासाठी पुढे आली आहे. 


धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज याने बोस्टन युनिव्हर्सिटी मधून इकॉनॉमिक्स मधून पदव्योत्तर शिक्षण घेऊन अमेरिकेत गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत होते. अमेरिकेतील चकचकीत राहणीमान, हायफाय संस्कृती आणि चांगल्या पगाराची नोकरी यात कोणीही अडकून पडेल, असे वाटत असताना घराच्या ओढीने विश्वराज पुन्हा भारतात परत आला. आपल्या शिक्षणाचा फायदा आजोबानी स्थापन केलेल्या साखर कारखान्यात करावा यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यापासून कारखान्यात सुधारणा करण्यास सुरुवात केली होती.
   
दरम्यान, भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यावर खासदार महाडिक यांनी आपल्या मुलाची उमेदवारी दाखल करीत राजकीय वारसदार समोर आणला. मात्र दोन वर्षे दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या संस्थेत राजकीय प्रवेशाचे काटेरी वाट देखील विश्वराज समोर होती. विश्वराज याने हे आव्हान स्वीकारत सध्या भीमाच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. अमेरिकेतील लाईफस्टाईल खूपच चांगली होती, मात्र मला परत आल्याचा पश्चाताप वाटत नसल्याचे विश्वराज सांगतो. सध्या विश्वराज हा सभासदांच्या घरोघरी जाऊन मते मागत असून प्रत्येक वस्तीवरील जेष्ठांच्या पाय पडत तर कधी चिमुरड्याने चॉकलेट देत जवळीक साधायचा प्रयत्न करताना दिसतो आहे. प्रत्येक वस्तीवर जाऊन बैठक घेत आमच्या चुका सांगण्याची विनंति करणारा विश्वराज खरंच बोस्टन युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे, का असा प्रश्न पडतो. चांगला राजकीय प्रवेशापेक्षा आपल्याला आवडीच्या ठिकाणी काम करायला मिळणे हेच माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे विश्वराज सांगतो. विष्वराज याने काय करावे हे त्याचा निर्णय होता,  त्याने अमेरिकेत करियर करावे ही आमची इच्छा होती, असे सांगत वडील धनंजय महाडिक यांनी भीमाचे नेतृत्व विश्वराज याच्या हातात देण्याचे संकेत दिले आहेत.