मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली. ही सदिच्छा भेट असली तरी त्याचे अनेक राजकीय अन्वयार्थ निघू शकतात, असं बोललं जात.


काही महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत यंदा भाजपला शिवसेनेच्या पाठींब्याची गरज लागणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र एनडीएचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रपती पदाचा उमेदवार देताना शिवसेनेला विश्वासात घेतले जावं, असा सूर शिवसेनेच्या गोटात आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्या अनेक नावांची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचं नाव आघाडीवर आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आनंदीबेन पटेल यांचंही नाव स्पर्धेत आहे.

मात्र प्रणव मुखर्जी यांची कारकीर्द वादातीत असल्याने राष्ट्रपतीपदी त्यांची पुन्हा निवड केल्यास शिवसेनेची त्याला हरकत नाही, अशी भूमिका याआधीच शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली होती.

त्यामुळे राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यात असताना उद्धव ठाकरे आणि प्रणव मुखर्जी या दोघांची ही एकमेकांना भेटण्याची इच्छा होती. आज मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने उमा योग्य जुळून आला.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा घेऊन मुख्यमंत्री मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह दिल्ली दरबारी पोहचण्याआधीच उद्धव ठाकरे हा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मोदींना शह देण्याची संधी साधली असावी, असं बोललं जातं.