नागपूरः खाकी वर्दीला पाहून थरथर कापणाऱ्या चोरट्यांना आता खाकीचाही धाक राहिलेला नाही. कारण नागपुरात चोरट्यांनी थेट पोलिसाच्याच घरावर दरोडा टाकला आहे. विशेष म्हणजे या दरचोरट्यांनी पोलिसाची खाकी वर्दी देखील पळवली आहे.

 

नागपूरातील गुंडगर्दीच्या घटना रोखण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. त्यातच थेट पोलिसांच्याच घरावर दरोडा पडल्यामुळे सामान्य नागरिकांचं काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

खाकी वर्दीसह लाखांचा ऐवज लाटला

लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेमंत राऊत यांच्या घरी पोलिसांनी रविवारी रात्री दरोडा टाकला. दागिने, रोख रक्कम, मोबाईल, असा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांचं एवढ्यावरच समाधान झालं नाही. त्यांनी राऊत यांच्या घरातील कपडेही चोरले.

 

हेमंत राऊतांची खाकी वर्दीही चोरट्यांनी पळवली आहे. त्यामुळं नागपुरातल्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचं मोठं आव्हान नागपूर पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. चोरट्यांनी पळवलेल्या वर्दीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी आधीच एक वर्दी चोरीला गेल्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे.