मुंबई : उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट पक्षाने कापल्यामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. 5 वर्षात खासदारांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मुंबईत 'मातोश्री'वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी उस्मानाबादवरून शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. परंतु या सर्व कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी वाशी टोल नाक्यावर अडवून या कार्यकर्त्यांना माघारी पाठवले आहे.


'परत जा अन्यथा गुन्हे दाखल करु', असा दबावतंत्र पोलिसांनी अवलंबल्याने कार्यकर्त्यांनी अखेर माघारी जाण्याचा निर्णय घेतला. खासदारांनी केलेल्या कामामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. परंतु अशा प्रकारे दबाव टाकण्यात आल्याने गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

शिवसेनेने नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार सर्वच विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. परंतु उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी मात्र रद्द करण्यात आली. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात चपलेने मारहाण केल्याने गायकवाड वादात सापडले होते. या वादामुळेच उस्मानाबादमधून शिवसेनेने गायकवाड यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळेच रवींद्र गायकवाडांचे समर्थक असलेले उस्मानाबादमधील शिवसैनिक पक्षावर नाराज आहेत. या नाराजीमुळेच हे शिवसैनिक आंदोलन करण्यासाठी मुंबईत आले होते.