औरंगाबाद : 'कुंपणच शेत खातं' ही म्हण सर्वांना परिचित आहे, मात्र याची प्रचिती औरंगाबादेत आली. त्याचं कारण म्हणजे नागरिकांचं चोरट्यांपासून संरक्षण करणारा पोलिसच मंगळसूत्राची चोरी करत असल्याचं समोर आलं.
औरंगाबादेत बीड बायपास रोडवर स्वामी समर्थ मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचं मंगळसूत्र पोलिसाने चोरलं. काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश शिणगारे असं चोरट्या पोलिस शिपायाचं नाव असून तो राज्य राखीव दलात शिपाई म्हणून कार्यरत आहे. यापूर्वीही तीन मंगळसूत्र चोरल्याची कबुली 'पोलिस चोरा'ने दिली आहे. मंगळसूत्र चोरुन तो सोनंतारण कर्ज घ्यायचा.