विवाहित तरुणाचा लग्नाचा तगादा, अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2018 07:55 AM (IST)
पोलिसांनी चार आरोपींवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
बारामती : विवाहित तरुणाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे बारामतीत अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये नागतळे भागात 17 वर्षांच्या तरुणीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गोंडे कुटुंबातील चौघांनी संबंधित तरुणीला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मयत तरुणीच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर भीमराव गोंडे, सोन्या ज्ञानेश्वर गोंडे, गणेश ज्ञानेश्वर गोंडे आणि दादा ज्ञानेश्वर गोंडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. 'आरोपी सोन्या गोंडे अचानक आमच्या घरी आला. मुलीला लग्नाची मागणी घालत तिची छेडछाड करु लागला. घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित मुलाच्या घरच्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनीच आम्हाला मारहाण करुन गाव सोडून निघून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे आलेल्या नैराश्य आणि भीतीपोटी मुलीने राहत्या घरात गळफास घेतली', अशी तक्रार मयत तरुणीच्या आईने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार आरोपींवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.